महाराष्ट्रपुत्र शहीद! आईने एकुलता एक पुत्र गमावला तर चिमुकल्याने पिता...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 05:02 PM2018-08-07T17:02:35+5:302018-08-07T17:15:49+5:30

शहीद झालेले 34 वर्षीय मेजर कौस्तुभ राणे हे ठाणे जिल्ह्यातील मीरारोडचे राहणारे होते. विशेष म्हणजे ते आई वडिलांचे एकुलते एक सुपुत्र होते.

34 years Major Kaustubh Rane from maharashtra was martyred in Jammu Kashmir Attack | महाराष्ट्रपुत्र शहीद! आईने एकुलता एक पुत्र गमावला तर चिमुकल्याने पिता...

महाराष्ट्रपुत्र शहीद! आईने एकुलता एक पुत्र गमावला तर चिमुकल्याने पिता...

Next

मीरारोड (ठाणे) - उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईत महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना वीरमरण आले. शहीद झालेले 34 वर्षीय मेजर कौस्तुभ राणे हे ठाणे जिल्ह्यातील मीरारोडचे राहणारे होते. विशेष म्हणजे ते आई वडिलांचे एकुलते एक सुपुत्र होते. त्यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील, बहीण, पत्नी व अडीच वर्षांचा मुलगा आहे. देशासाठी लढताना आईने आपला एकुलता एक मुलगा गमावला तर अडीच वर्षाच्या चिमुकल्याने आपले वडिल गमावले आहेत.

मीरारोडच्या शीतल नगर येथील हिरल सागर इमारतीत पहिल्या मजल्यावर राणे कुटुंब राहते. ते मुळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत. पण, सुमारे 30 वर्षांपासून येथील मीरारोड परिसरात राहतात. सोमवारी रात्रीपासूनच घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी भारतीय जवानांचा लढा सुरू होता. आज सकाळी मेजर राणेंसह तीन जवान शहीद झाल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले. मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याचे वृत्त समजताच परिसरात शोककळा पसरली आहे. याच भागात कौस्तुभ राणे लहानाचे मोठे झाले. येथील हॉली क्रॉस शाळेत त्यांनी आपले शिक्षण घेतले होते. तर त्यांचे वडीलही राणे काका म्हणून या भागात सुपरिचित आहेत. कौस्तुभ यांचे वडील टाटा कंपनीत तर आई ज्योती या बोरिवलीच्या गोखले शैक्षणिक संस्थेत होत्या. सध्या दोघेही निवृत्त आहेत. तर कौस्तुभ यांच्या पत्नी कनिका व अडीच वर्षांचा मुलगाही येथेच राहायला आहेत. पत्नी कनिका मुलास घेऊन गावी गेल्या होत्या तर आई-वडीलही गावी जायच्या तयारीत होते. यंदा, कौस्तुभ यांना यंदा सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते. कौस्तुभ यांच्या सैन्यातील कामगिरीबद्दल राणे कुटुंबियांसह मीरा रोड परिसरातील रहिवाशांनाही खूपच अभिमान होता.

Web Title: 34 years Major Kaustubh Rane from maharashtra was martyred in Jammu Kashmir Attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.