नेत्रदानातून ३४७ जणांना दृष्टी
By Admin | Published: June 17, 2017 01:33 AM2017-06-17T01:33:57+5:302017-06-17T01:33:57+5:30
शासनाने दिलेल्या नेत्रदानाच्या टार्गेटपेक्षा यंदा ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून दुप्पटीने नेत्रदान झाल्याची बाब पुढे आली आहे. यामुळे २००६-१७ या वर्षात ३४७ जणांना दृष्टी
- पंकज रोडेकर । लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शासनाने दिलेल्या नेत्रदानाच्या टार्गेटपेक्षा यंदा ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून दुप्पटीने नेत्रदान झाल्याची बाब पुढे आली आहे. यामुळे २००६-१७ या वर्षात ३४७ जणांना दृष्टी मिळाल्याची माहिती ठाणे जिल्हा नेत्रदान विभागाने दिली.
दरवर्षी शासनाकडून नेत्रदानाबाबत प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट दिले जाते. त्याच प्रमाणे ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही २०१६-१७ या वर्षाकरीता चारशेचे टार्गेट दिले होते. त्यानुसार,या दोन्ही जिल्ह्यातून एकूण ७८६ जणांनी नेत्रदान केले होते. त्यामुळे यंदा नेत्रदानाचे टार्गेट दुप्पटीने वाढल्याचे नेत्रदान विभागाकडून सांगण्यात आले. तर एवढ्या मोठ्याप्रमाणात नेत्रदान झाल्याने त्यातील सर्व नेत्र उपयुक्त ठरले नसले तरी, त्यातील उपयुक्त असलेले नेत्र हे प्रतिक्षा यादीतील ३४७ व्यक्तींना लाभल्याने त्यांना दृष्टी मिळाली आहे.अशाप्रकारे ठाणे, मुंबईतील लोकांना दृष्टी मिळाल्याची माहिती संबंधित विभागाने दिली.
शासनाच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदानाबाबत दोन्ही जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.सी. केम्पीपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्याप्रमाणात जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली होती. त्यानुसार, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात नेत्रदानाची चळवळ उभी राहिल्याचे बोलले जात आहे. तसेच नेत्रदान होणाऱ्या प्रत्येक नेत्राची सखोल तपासणी केली जाते. ही तपासणी करताना, ते नेत्र खरोखरच कोणाच्या उपयुक्त आहेत का? तसेच नेत्रदान करणाऱ्या दात्याला कोणता गांभीर आजार होता का? हे प्रामुख्याने पाहिले जाते. त्यानंतर नेत्ररोपण करण्यासाठी ते नेत्र संबंधित सामाजिक संस्था, वैद्यकीय महाविद्यालय,रुग्णालय येथे पाठवले जाते. उर्वरित नेत्र वैद्यकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाठवले जाते. तर नेत्रदान करणाऱ्यांमध्ये एखादा एचआयव्ही रुग्ण असण्याची शक्यता असल्याने ही तपासणी करून त्याबाबत काळजी घेतली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
‘‘ यंदा ७८६ जणांना नेत्रदान केले आहे. त्यामुळे ३४७ जणांना दृष्टी मिळाली आहे. याबाबत राबविण्यात आलेल्या जनजागृतीचे हे फलीत असल्याचे दिसते.’’
- डॉ. पी.के.देशमुख, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक, ठाणे.