अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ३५ जोडपी विवाहबद्ध, दिवसभर जोडप्यांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:45 AM2019-05-08T01:45:27+5:302019-05-08T01:45:46+5:30
अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील जवळपास ३५ जोडपी विवाहबद्ध झाल्याची माहिती जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाने दिली.
ठाणे : अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील जवळपास ३५ जोडपी विवाहबद्ध झाल्याची माहिती जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयाने दिली. डोक्याला बाशिंग बांधूनच ती आली होती. त्यांच्यासोबत आलेले नातेवाईकही नटूनथटून आले होते. अक्षयतृतीयेला शुभमुहूर्त मानून १० जोडप्यांनी विवाहासाठी नोंदणी केली आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानल्या जाणाऱ्या अक्षयतृतीयेच्या दिवशी नविन वस्तूंची खरेदी केली जाते. या दिवशीचा मुहूर्त साधून अनेक विवाह इच्छुक जोडपी विवाह बंधनात अडकतात. अनोख्या मुहूर्तावर लग्न करण्याची जोडप्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ असते. एखादी अनोखी तारीख असो वा व्हॅलेण्टाईन डे, गुढीपाडवा, १ जानेवारी अशा दिवसांचे विवाहोच्छुक जोडपी विवाहबंधनात अडकण्यासाठी मुहूर्त साधत असतात. मंगळवारी अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून विवाहनोंदणी कार्यालयात ३५ जोडपी लग्नाच्या बेडीत अडकली. गेल्यावर्षी २५ जोडपी विवाहबद्ध झाली होती. या जोडप्यांना आशिर्वाद देण्यासाठी त्यांचे मित्र परिवार, जवळचे नातेवाईक उपस्थित होते. विवाह सोहळा पार पडल्यावर या जोडप्यांनी एकमेकांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला.
या दिवशी विवाहबंधनात अडकण्यासाठी या जोडप्यांनी एक महिना आधीच आॅनलाईन पद्धतीने नोटीस दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी जिल्हा विवाहनोंदणी कार्यालयात येऊन नोंदणी पद्धतीने विवाह केला. सकाळी दहा वाजल्यापासून कार्यालयात रांग होती, जोडप्यांच्या चेहºयावर उत्साह दिसून येत होता, अशी माहिती कनिष्ठ लिपीक पी. व्ही. काळबगार यांनी लोकमतला दिली. याच दिवशी लग्न करायचे असे आम्ही ठरविले होते, असे विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांनी सांगितले.
अक्षय तृतीयेच्या दिवशी गर्दी असते म्हणून आदल्या दिवशीच ३८ जोडपी विवाहबद्ध झाली. यात दिव्यांग जोडप्याचाही समावेश होता, असे विवाहनोंदणी कार्यालयाच्या पी.व्ही. काळबगार म्हणाल्या. बुधवारीही अशीच गर्दी राहू शकते.