सेनेच्या इच्छुकांत ३५ पदवीधर
By admin | Published: April 29, 2017 01:33 AM2017-04-29T01:33:11+5:302017-04-29T01:33:11+5:30
भिवंडीमध्ये खऱ्या अर्थाने निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पक्ष कार्यालयात बैठकांवर बैठका होत
रोहिदास पाटील / अनगाव
भिवंडीमध्ये खऱ्या अर्थाने निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पक्ष कार्यालयात बैठकांवर बैठका होत असून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. शिवसेनेकडून मागील चार दिवसांत १०८ जणांनी अर्ज नेले असून ७० जणांनी अर्ज दाखल केले आहेत. सेनेतील इच्छुकांच्या यादीत ३५ जण पदवीधर आहेत. सुशिक्षित उमेदवाराला तिकीट देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
या निवडणुकीत विद्यमान सर्वच नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर, आठ पतीपत्नी निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती शिवसेनेचे शहर जिल्हासचिव दिलीप नाईक यांनी ‘लोकमत’ला दिली. महापौर तुषार चौधरी, त्यांच्या मातोश्री व नगरसेविका उषा यशवंत चौधरी, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक मदन नाईक, गुलाब नाईक, सुंदर नाईक, अनिता नाईक, माजी उपमहापौर मनोज काटेकर, वंदना काटेकर, शहर जिल्हा सचिव दिलीप नाईक, रंजना नाईक, श्रीनाथ पाटील, आनंदी पाटील हे पतीपत्नी पुन्हा निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत.
शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे. दुसऱ्या बाजूला भाजपा, काँग्रेस, समाजवादी, अपक्ष आदी १८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यात गुजराती, मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे, अशी माहिती उपशहरप्रमुख मनोज गगे यांनी दिली. इच्छुकांपैकी ३५ जण पदवीधर, तर अन्य बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत.
निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची आ. रूपेश म्हात्रे, शहर जिल्हाप्रमुख सुभाष माने, प्रमुख पदाधिकारी यांच्यासमवेत लवकरच बैठक होणार आहे. उमेदवारांच्या मुलाखती १ व २ मे रोजी होणार असून ३ किंवा ४ मे रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. ५, ६ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, असे शहर सचिव दिलीप नाईक यांनी सांगितले.
काँग्रेसचे उमेदवार मंगळवारी ठरणार-
पंकज रोडेकर/ ठाणे
भिवंडी महापालिकेसाठी काँग्रेस पक्षाने इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जवळपास पूर्ण झाला आहे. त्यातच, इतर महापालिकांच्या निवडणुकीप्रमाणे भिवंडीतही पॅनल पद्धतीने निवडणूक होणार असल्याने त्यादृष्टीने काँग्रेसकडून उमेदवार चाचपणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. मंगळवारी याबाबत काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात होणाऱ्या बैठकीत यादीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
भिवंडी महापालिकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काँग्रेसने इच्छुकांना अर्जवाटप करून मुलाखती घेऊन तयारी सुरू केली होती. त्यानंतर, त्या इच्छुकांची चाचपणीही केली. त्यातच बोगस मतदारांची नावे वगळण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर ही निवडणूक लांबणीवर पडते की काय, अशी शंका होती. मात्र, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखेलाच निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. परंतु, तत्पूर्वीच इतर राजकीय पक्षांच्या एक पाऊल पुढे असलेल्या काँग्रेसकडून पॅनलपद्धतीनुसार इच्छुकांची चाचपणी अंतिम टप्प्यात आहे. मंगळवारी मुंबईत बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतरच भिवंडीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपाविरोधात धर्मनिरपेक्ष पक्षांची मोट