खासगी संस्थेच्या माध्यमातून ठाण्यात नव्या ३५ बालवाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:52 AM2018-07-17T02:52:45+5:302018-07-17T02:52:50+5:30
संपुष्टात येत असलेली बालवाडीची संकल्पना पुन्हा ताजी करण्यासाठी शिक्षण मंडळाने महापालिकेच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींमध्ये ज्या ठिकाणी बालवाडी नाही
ठाणे : संपुष्टात येत असलेली बालवाडीची संकल्पना पुन्हा ताजी करण्यासाठी शिक्षण मंडळाने महापालिकेच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींमध्ये ज्या ठिकाणी बालवाडी नाही, त्याठिकाणी स्वारस्य अभिव्यक्तीद्वारे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संयुक्त भागीदारीतून ३५ नव्या बालवाड्या सुरूकरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत मराठी माध्यमाच्या ५६ व उर्दू माध्यमाच्या पाच अशा एकूण ६१ बालवाड्या असून त्यामध्ये केवळ १८७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या ६१ पैकी ३७ बालवाड्या प्राथमिक शाळेच्या इमारतींत भरत आहेत. या सर्व प्राथमिक शाळा ७० इमारतींमध्ये भरत आहेत. त्यापैकी ३३ प्राथमिक शाळांच्या इमारतीत बालवाडीवर्ग भरवले जात नाहीत.
त्यामुळे त्या ठिकाणच्या प्राथमिक शाळांचा पटही कमी होत असल्याचा मुद्दा शिक्षण विभागाने उपस्थित केला आहे. २४ बालवाड्या प्राथमिक शाळेच्या इमारतींपासून दूर अंतरावर भरत असल्याने बालवाडीतील विद्यार्थी पहिलीमध्ये इतर खाजगी शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. पटवाढीच्या दृष्टिकोनातून ३५ शाळांच्या इमारतींमध्ये बालवाडीवर्ग नाहीत, त्यामध्ये मराठी माध्यमाच्या २८ व उर्दू माध्यमाच्या पाच व इंग्रजी माध्यमाच्या दोन अशा शाळांचा समावेश आहे. त्यामुळे ३५ बालवाडीवर्ग स्वारस्य अभिव्यक्तीअंतर्गत सेवाभावी संस्थेकडून सुरू करण्याचे शिक्षण विभागाने निश्चित केले आहे.
>नियुक्ती संस्था करणार, पगार पालिका देणार
याअंतर्गत पालिका फक्त जागा उपलब्ध करून देणार असून संस्थेने शिक्षकांची व सेविकांची नियुक्ती करायची आहे. ती नियुक्ती जून ते मार्च या कालावधीसाठी असावी. नियुक्त केलेल्या बालवाडी शिक्षिका व मदतनीसांचा पगार पालिका देणार असून त्यांचे व्यवस्थापनाचे काम मात्र संस्थेमार्फत केले जाणार आहे. यासाठी पालिकेने ११ स्वरूपाचे निकषही ठेवले आहेत, जे या निकषात बसतील, त्याच संस्थेला हे काम दिले जाणार आहे. या योजनेसाठी वार्षिक २९ लाख पाच हजारांचा खर्च अपेक्षित आहे. तो २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात आउटसोर्सिंगमधील कर्मचाऱ्यांचे मानधन या लेखाशीर्षकाखाली देण्यात येणार आहे.
>या योजनेची उद्दिष्टे
या योजनेचा मुख्य उद्देश ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे, हा आहे. तसेच महापालिका शाळांच्या परिसरातील मुलांना बालवाडीवर्गाची सुविधा पुरवून सहजपणे शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे आहे.