व्यापारी, दलाल यांच्यामुळे ३५ टक्के महागाई
By Admin | Published: June 4, 2017 05:09 AM2017-06-04T05:09:45+5:302017-06-04T05:09:45+5:30
शेतकऱ्यांच्या शेतातून एक किलो तांदूळ किंवा एक किलो फ्लॉवर जेव्हा ठाण्यातील ग्राहकापर्यंत पोहोचतो, तेव्हा त्याच्या किमतीत ३० ते ३५ टक्के वाढ झालेली असते. बाजार समितीमधील
- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शेतकऱ्यांच्या शेतातून एक किलो तांदूळ किंवा एक किलो फ्लॉवर जेव्हा ठाण्यातील ग्राहकापर्यंत पोहोचतो, तेव्हा त्याच्या किमतीत ३० ते ३५ टक्के वाढ झालेली असते. बाजार समितीमधील व्यापारी, दलाल, हमाल, मापारी, घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापारी या प्रत्येकाच्या स्तरावर खाद्यपदार्थांचे दर वाढतात. परिणामी, शेतकरी कफल्लक राहतो आणि ठाणेकर ग्राहक हा महागाईने पोळला जातो. त्यामुळे शेतातील माल थेट ठाणेकरांपर्यंत आणण्याचे अलीकडे राबवण्यात आलेले उपक्रम वर्षभर राबवून दलालांचे कंबरडे मोडण्याची गरज शेतकरी व ग्राहक व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांनी एक किलो ज्वारी पिकवली आणि थेट ठाण्यात आणून विकली, तर ३० ते ३२ रुपये दराने विकू शकतात. मात्र, तीच ज्वारी शेतकऱ्याने बाजार समितीमधील व्यापाऱ्याला विकली, तर तो शेतकऱ्याला २० रुपये दर देताना त्यातून पाचते सात रुपये वाहतूक खर्च व हमाली याकरिता कापून घेतो. त्यानंतर, घाऊक व्यापाऱ्यांकडे ही ज्वारी विकण्याकरिता येते, तेव्हा तोच व्यापारी किंवा दलाल पुन्हा वाहतूक खर्च, हमाली, लेव्ही वसूल करतो. त्यानंतर, ही ज्वारी किरकोळ व्यापाऱ्याकडे विक्रीला येते, तेव्हा तोही त्याचा नफा काढतो. त्यामुळे समजा शेतकऱ्याचा माल थेट ठाण्यातील ग्राहकांपर्यंत आला, तर शेतकऱ्याला किमान १२ ते १५ रुपयांचा लाभ होईल आणि जवळपास तेवढेच पैसे ठाण्यातील ग्राहकांचेही वाचतील.
बाजारसमितीत व्यापारी, दलाल, हमाल, मापारी, घाऊक बाजारपेठेतील मोठे व्यापारी, किरकोळ व्यापारी अशी साखळी मोडून काढली, तर शेतकरी व ग्राहकांचा मोठा फायदा होईल, अशी मांिहती शेतकरी एस. घोडके यांनी दिली. भाजीपाला हा धान्याच्या तुलनेत लवकर खराब होत असल्याने शेतकऱ्यांना तो साठवून ठेवता येत नाही. परिणामी, मिळेल त्या भावाने तो व्यापाऱ्यांना विकावाच लागतो. यात शेतकऱ्यांना कधीकधी मुद्दलही हाती लागत नाही, असेही त्यांनी सांगितले.
शेतातील तोच माल मात्र जेव्हा धान्य, भाजी महोत्सवासारख्या उपक्रमांतून ग्राहकांपर्यंत थेट आणला जातो, तेव्हा मात्र आम्हाला ट्रान्सपोर्ट वगळता इतर कोणताही खर्च नसतो. त्यामुळे व्यापाऱ्यांद्वारे विक्री होणाऱ्या मालापेक्षा अशा महोत्सवांतून शेतकऱ्यांना सुमारे ५० टक्के अधिक फायदा मिळत असतो.
इथे शेतकरी ते थेट ग्राहक असाच व्यवहार असल्याने मधल्या कोणत्याही टप्प्यातील व्यक्तींचे कमिशन त्यात नसते. परिणामी, आम्हालाही चांगला भाव मिळतो आणि ग्राहकांनाही तुलनेने १०-२० टक्के कमी दरात मालखरेदी करता येतो. त्यामुळे दोघांचाही यात फायदा असतो. मात्र, अशाप्रकारचे महोत्सव केवळ काही दिवसांपुरतेच मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांना कायमस्वरूपी एखादी पेठ त्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी टी.व्ही. चाळके यांनी केली.
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही, ही बाब खरी आहे. मात्र, किरकोळ विक्रेत्यांनाही व्यापारी चढ्या दरानेच तो माल विक्री करतात. त्यामुळे त्यांनाही वैयक्तिक नफ्यासाठी तो वाढीव दराने ग्राहकांना द्यावा लागतो. यात शेतकरी आणि ग्राहक दोघांचेही नुकसान असले, तरी सर्वाधिक फायदा दलाल आणि मोठ्या व्यापाऱ्यांचा असतो. त्यामुळे त्यांच्या कमिशनवर वचक बसला पाहिजे. कायद्यात तशी तरतूदही आहे. मात्र, शासकीय अधिकारी, बाजार समितीचे अधिकारी व राज्यकर्ते कार्यवाही करत नाहीत. -विलास ढमाले, अध्यक्ष, महात्मा फुले मंडई