शिवसेनेचे 35 आमदार नाखूश! मनसेबाबत बाळगले मौन; नारायण राणेंनी घेतला ठाकरेंचा समाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 06:21 PM2020-01-12T18:21:43+5:302020-01-12T18:23:03+5:30
ठाण्यातील वर्तकनगर येथील 22 व्या मालवणी महोत्सवास शनिवारी रात्री भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ठाणे : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ त्यांचे पुत्र तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनाही लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेचे 54 पैकी 35 आमदार सरकारवर नाराज असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, मनसे आणि भाजपच्या संभाव्य युतीबाबत बोलण्यास नकार देऊन यावर पक्षाचे प्रमुखच बोलतील, असेही ते म्हणाले.
ठाण्यातील वर्तकनगर येथील 22 व्या मालवणी महोत्सवास शनिवारी रात्री भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे पितापुत्रावर टीका केली. या सरकारने दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा करून जो शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे, त्यात अंतिम तारखेचा उल्लेख नाही. यामुळे ती कधी मिळेल, हे सांगता येत नाही. तसेच भाजप कोणाकडे गेला नव्हता, तर शिवसेना स्वत: त्यांच्याकडे आली होती. भाजप केंद्रात सत्तेत असून महाराष्ट्रातदेखील सर्वाधिक आमदार आहेत. यामुळे भाजपला कोणाची फिकीर करण्याची गरज नाही, असेही राणे म्हणाले.
आदित्य यांनी आधी मंत्र्याची जबाबदारी पार पाडावी
या सरकारला गांभीर्य नाही. प्रशासन काय असते, विकास कसा करायचा, हे ठाऊक नसलेल्या माणसाच्या हातात सत्ता गेली असून त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवायची, असे ते म्हणाले. या सरकारला दोन महिने मंत्रिमंडळ जाहीर करायला लागले, असा आरोपही राणे यांनी केला. तर, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ट्विटबाबत विचारणा केल्यावर त्यांनी शिकवायची गरज नाही, भाजपमध्ये शिकलेले लोक आहेत. त्यांना कायदा काय, हे माहीत आहे. जी मंत्र्याची जबाबदारी आहे, ती त्यांनी आधी पार पाडावी. जबाबदारीबाबत काय कळते, हे आधी बघावे. नंतरच, भाजपविषयी बोलावे, अशा शब्दांत राणे यांनी आदित्य यांचा समाचार घेतला.