आदानप्रदानासाठी ३५ हजार पुस्तके
By admin | Published: April 10, 2017 05:27 AM2017-04-10T05:27:49+5:302017-04-10T05:27:49+5:30
पै फ्रेन्डस लायब्ररी, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि डोंबिवली सांस्कृतिक परिवाराच्या पुस्तक आदान-प्रदान
डोंबिवली : पै फ्रेन्डस लायब्ररी, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ आणि डोंबिवली सांस्कृतिक परिवाराच्या पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शनाला रविवारपासून सुरूवात झाली. देशातील असे हे पहिले पुस्तक आदान-प्रदान प्रदर्शन आहे. त्यात ३५ हजार पुस्तके मांडण्यात आली आहेत. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हा व्यासपीठावर यावेळी टिळकनगर संस्थेचे पदाधिकारी आबासाहेब पटवारी, आशीर्वाद बोंद्रे, नगरसेवक राजन आभाळे, पै फ्रेंण्डस लायब्ररीचे पुंडलिक पै आदी उपस्थित होते.
पहिल्या दिवशी बालसाहित्य, धार्मिक पुस्तके, कथा-कादंबऱ्या मांडल्या होत्या. मराठीसोबत इंग्रजी पुस्तकेही आहेत. सोबत नामवंत साहित्यिकांची पुस्तके दहा टक्के सवलतीत विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.
चव्हाण यांनी या दालनाला पुस्तकांच्या जत्रेची उपमा दिली. या संकल्पनेमुळे वाचकांना दुर्मिळ पुस्तकांचा आनंद लुटता येणार असल्याचे ते म्हणाले.
वाचन कमी होत असल्याने त्याची गोडी वाढवण्यासाठी ही संकल्पना मांडल्याचे पै म्हणाले. सोबत साहित्यानंद, ज्ञान गंगा आली अंगणी उपक्रम होतील. त्यात १६ एप्रिलपर्यंत सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत पेंढरकर सभागृहात विविध विषयांवरील व्याख्याने होतील. पुस्तक आदान-प्रदान ही संकल्पना लिम्का बुकपर्यंत जाईल, असा विश्वास पटवारी यांनी व्यक्त केला. पै फे्रन्डस लायब्ररीतर्फे होणाऱ्या बालसंस्कार वर्गात १५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. स्मिता तळेकर आणि त्यांच्या सात सहकारी मुलांना गोष्टी शिकवणार आहेत. त्यात मनाचे श्लोक, खेळ, पपेट शो, पुस्तकहंडी, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा होतील. सूत्रसंचालन महेश ठाकूर यांनी केले. तर आभार मीना गोडखिंडी यांनी मानले. (प्रतिनिधी)
अशी आहे योजना... : वाचनाचा प्रचार-प्रसार व्हावा, उत्तमोत्तम पुस्तके संग्रही असावीत या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ते टिळकनगर शाळेच्या आवारात रविवार, १६ एप्रिलपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. वाचकांनी आपल्या घरातील कोणतेही पुस्तक घेऊन यायचे आणि त्या बदल्यात दुसरे पुस्तक न्यायचे अशी ही योजना आहे. एका वाचकाला कमीत कमी दहा पुस्तके बदलता येतील. आतापर्यंत ३५ हजार पुस्तके जमा झाली आहेत. दर्जेदार पुस्तके शेवटच्या दिवसापर्यंत वाचकांना मिळावी, यासाठी ती टप्प्याटप्प्याने प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रदर्शनात दररोज नवीन पुस्तकांची भर पडेल.