३५० कोटींच्या विकासकामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 04:22 AM2018-05-19T04:22:27+5:302018-05-19T04:22:27+5:30
शहरातील तब्बल ३५० कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्त्विक मंजुरी दिली. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीला महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, स्थायी सभापती जया माखिजा, आयुक्त गणेश पाटील यांच्यासह एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.
उल्हासनगर : शहरातील तब्बल ३५० कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्त्विक मंजुरी दिली. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीला महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, स्थायी सभापती जया माखिजा, आयुक्त गणेश पाटील यांच्यासह एमएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. मात्र, सत्ताधारी पक्षातील ओमी टीमला भाजपाने जाणीवपूर्वक लांब ठेवले आहे. दरम्यान, महापालिकेवर भाजपा-ओमी टीम व साई पक्षाची सत्ता असून महाआघाडीतील ओमी टीमचे पदाधिकारी व नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गैरहजर होते. या प्रकाराने पुन्हा महापालिका सत्तांतराच्या चर्चेला ऊत आला आहे.
उल्हासनगरातील विकासकामांबाबत महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट मागितली होती. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी दुपारी अडीच वाजता बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला एमएमआरडीएचे अधिकारीदेखील उपस्थित होते. रस्ते विकासासाठी विशेष निधी, कबरस्तान, बोट क्लबचा विकास, ४००० ते ५००० चौ. मीटरवरील जागेला क्लस्टर योजना, बॅरेक आणि झोपडपट्टीतील घरांची १८ फूट उंची, अंबरनाथ-कल्याण रस्त्याचा विकास, रुंदीकरणातील व्यापाऱ्यांना पर्यायी जागा, उद्यानाचा विकास, धोकादायक इमारती आदी कामांची चर्चा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झाली.
यावेळी महापौर आयलानी आणि आयुक्त गणेश पाटील यांनी अनेक समस्या मांडल्या. महापालिका निवडणुकीदरम्यान विशेष निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार, बैठकीतील विविध विकासकामांसाठी तब्बल ३५० कोटींच्या कामाला तात्त्विक मंजुरी दिल्याची माहिती महापौरांनी शुक्रवारी स्थायी समिती सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपाचे माजी आमदार आणि शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, प्रकाश माखिजा, मनोज लासी यांच्यासह महापालिका विभागप्रमुख, नगरसेवक आदी उपस्थित होते.
>ओमी टीम भाजपाच्या टार्गेटवर
महापालिकेत ओमी टीमच्या महाआघाडीने भाजपा सत्तेत बसली. मात्र, वर्षभरात दोघांत वाद निर्माण झाल्याने भाजपाने ओमी टीमला सत्तेपासून दूर ठेवण्याचा अंतर्गत निर्णय घेतला आहे. त्यातूनच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला ओमी टीमच्या सदस्यांना जाणीवपूर्वक आमंत्रण देण्याचे टाळण्यात आल्याची चर्चा शहरात आहे. महापौरपदासह आमदारपदापासूनही ओमी टीमला दूर ठेवण्याची व्यूहरचना आखण्यात आल्याची प्रतिक्रिीया भाजपा पदाधिकाºयांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली आहे.