३५० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 04:43 AM2018-10-02T04:43:04+5:302018-10-02T04:43:35+5:30
कल्याणमधील लक्ष्मी भाजी मार्केटमध्ये कारवाई : ५० हजार रुपयांचा दंड वसूल
कल्याण : प्लास्टिक पिशव्यांच्या विक्रीवर राज्य सरकारने मार्च २०१८ पासून बंदी घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर केडीएमसीची कारवाई थंडावल्याने काही ठिकाणी लपूनछपून, तर काही ठिकाणी सर्रास प्लास्टिक पिशव्यांची विक्री व वापर केला जात आहे. ही बाब लक्षात घेता सोमवारी प्लास्टिक पिशव्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. यावेळी ३५० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. तसेच ५० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
लक्ष्मी भाजी मार्केटमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील, उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुले, केडीएमसीच्या आरोग्य विभागाचे अधिकारी विलास जोशी यांनी पोलीस बंदोस्तात प्लास्टिक पिशव्यांचा शोध घेतला. यावेळी अनेक भाजीविक्रेत्यांनी भाजीच्या टोपल्यांखाली प्लास्टिकच्या पिशव्या लपवल्याचे आढळले. या पिशव्या जप्त करून त्यांच्याकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला. यावेळी काही फेरीवाल्यांनी तडजोडीची विनंती केली. प्लास्टिक पिशव्या सर्रास विकल्या जातात. मग, आमच्यावरच कारवाई का, असा सवाल काहींनी केला. मात्र, कारवाई पथकाने त्यांना दाद दिली नाही. अनेक विक्रेत्यांनी पथकासोबत अरेरावीची भाषा केली असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू झाल्याने भाजी मार्केटमधील व्यापारीवर्गात व विक्रेत्यांमध्ये धावपळ उडाली. कारवाईची खबर मार्केटमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे अन्य विक्रेते सावध झाले. कारवाई पथकाने त्यांचा मोर्चा कपडेविक्रेत्यांच्या दुकानांकडे वळवला. अनेक व्यापारी दुकानात प्लास्टिक पिशव्या विकत असल्याचे दिसून आले.
व्यापाºयांनी दुधी भोपळा प्लास्टिक पिशवीत ठेवला होता. त्याचबरोबर १५ ते २० किलो वांगी, कारली, भेंडी, काकडी या भाज्यांच्या प्लास्टिक बॅगा आढळून आल्या. त्यालाही कारवाई पथकाने हरकत घेतली आहे. हे पॅकिंग शेतकºयांकडून आल्याचे सांगण्यात आले.
नॉन व्हीविंग बॅगही जप्त
च्काही दुकानदारांनी भाजीच्या पाटीखाली प्लास्टिक पिशव्या ठेवल्या होत्या. समोर दर्शनी भागात नॉन व्हीविंग बॅगा टांगून ठेवल्या होत्या. या बॅगाही पथकाने जप्त केल्या. त्या प्लास्टिकच्या नाहीत, मग त्या का जप्त करता, असा संतप्त सवाल व्यापारी व विक्रेत्यांनी केला.
च्मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील यांनी सांगितले की, नॉन व्हीविंग बॅगांच्या उत्पादनात थर्माकोलचा वापर केला आहे. थर्माकोलच्या वापरावर बंदी आहे. त्यामुळे कापडी पिशव्या व कागदी पिशव्यांशिवाय कोणत्याही प्रकारच्या पिशव्यांचा वापर करता येणार नाही. कापडी व कागदी पिशव्यांचा वापर नागरिक व व्यापाºयांनी करावा.