अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतिनिमित्त चित्रकला स्पर्धेत ३५० विद्यार्थ्यांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 07:00 PM2018-12-25T19:00:56+5:302018-12-25T19:01:05+5:30
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतिनिमित्त डोंबिवलीत बालभवनमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
डोंबिवली: भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतिनिमित्त डोंबिवलीत बालभवनमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेला म्हात्रेनगर, रामनगर आणि शहरातील ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. आई वडीलांसमवेत माझा वाढदिवस, बेटी बचाव बेटी पढाव, कमळ यांसारख्या असंख्य विषयांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. पाचहून अधिक गटांमध्ये संपन्न झालेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रचंड हौशीने सहभाग उत्तमोत्तम चित्रे रेखाटल्याची माहिती आयोजक ज्येष्ठ नगरसेवक विषू पेडणेकर यांनी दिली.
बालभवन येथील मीनी थिएटरमध्ये मंगळवारी सकाळी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ही स्पर्धा घेण्यात आी होती. त्यामधील पहिली ते दुसरीच्या गटामध्ये चैतन्य कदम, मनुश्री महाजन, मधुरा कोंडे, तिसरी चौथीच्या गटात मनुश्री इंगळे, किमया साठे, सप्तशी सरकार आदींसह उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पाचवी ते सातवी च्या गटामध्ये खुशी मौर्या, मुग्धा कोंडे, अद्वैत नायर आणि ८ वी ते १० वीच्या गटामध्ये श्रेयसी दुर्वे, रूचा जोशी, यशोधन विचारे आदी विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या गटामध्येही उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली. खुल्या गटामध्ये संजना गजीनकर, मृदुला राणे, सोनाली सोमवंशी आदींना सन्मानित करण्यात आल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली.
या स्पर्धेसाठी विद्यानिकेतन, पाटकर विद्यालय, डॉन बॉस्को, सिस्टर निवेदीता, रॉयल इंटरनॅशनल, बी.आर. मढवी, होली एंजल, एस.के.पाटील, मॉडेल इंग्लिश स्कूल, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रूपारेल महाविद्यालय, साऊथ इंडियन, ब्लॉसम स्कूल, सेंट मेरी, सेंट तेरेसा शाळा, होली एंजल शाळा, टिळकनगर विद्यामंदिर आदी शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमित कासार, अमित टेमकर, रवी साळवी, संतोष देसाई, पुर्णिमा पेडणेकर, रसिका जोशी, संचिता परब आदींचे योगदान मोलाचे असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. दरम्यान, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पर्धा निकोप असावी, विद्यार्थ्यांनी विजिगिषू वृत्ती अंगी बाणावी, यशाने हुरळून जाऊ नये, अपयशाने खचून जाऊ नये. तसेच परिश्रमाचे सातत्य आणि कर्तबगारांची आत्मचरित्र वाचावीत, जेणेकरून आयुष्याला एक दिशा मिळेल. प्रामाणिकपणे जीवन जगावे असे आवाहन केले. चव्हाण यांच्याहस्ते विजेत्यांना पारितोषिक देउन सन्मानित करण्यात आले.