अंबरनाथच्या मतदारयादीत ३५ हजार बोगस नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:53 AM2021-02-20T05:53:06+5:302021-02-20T05:53:06+5:30
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या मतदानासाठीची तयार केलेल्या प्रारूप मतदारयादीमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ असयाचा आरोप गुरुवारी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप ...
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या मतदानासाठीची तयार केलेल्या प्रारूप मतदारयादीमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ असयाचा आरोप गुरुवारी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात आलेल्या हरकतींवर योग्य कार्यवाही न केल्यास या मतदारयादीविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील अस्तित्वातील मतदारयादीत ३० ते ३५ हजार बोगस मतदारांचा समावेश असून त्याबाबतदेखील योग्य ती कार्यवाहीची मागणी त्यांनी केली.
अंबरनाथ नगरपालिकेच्या मतदारयादीत अनेक त्रुटी असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. प्रभागनिहाय मतदारयादी बनवताना विधानसभेची यादी फोडून मतदारांचा समावेश प्रभागनिहाय यादीमध्ये करण्यात येत आहे. हे करीत असताना कोणत्याही प्रभागाची नावे कोणत्याही प्रभागात जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. ही यादी तयार करताना इतर प्रभागातील नावे बेधडकपणे टाकण्यात येत असल्याने त्यावर आक्षेप घेण्यासाठी दिलेली मुदत अपुरी पडत आहे. बोगस मतदारांची नावे काढणे शक्य नसले तरी ती नावे नेमकी कोणत्या प्रभागात टाकावी याबाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. मतदारयाद्यांमधील गोंधळ हा अधिकाऱ्याच्या चुकीमुळे झाला असून त्यांनी प्रत्येक मतदारयादीसाठी नेमलेला हॅलो हा जागेवर जाऊन काम न करीत असल्याने सर्वाधिक गोंधळ झाल्याचा आरोप त्यांनी केला.
मतदार याद्यांमध्ये ज्या हरकती येतील त्या हरकतींसाठी कागदपत्र मागणे हे योग्य नसून कर्मचाऱ्यांनी जागेवर जाऊन त्याची पाहणी करावी आणि त्यानंतरच त्या मतदाराचे नाव योग्य त्या मतदारयादीत समाविष्ट करावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.