३६९३ इमारतीतील रहिवासी बेघर होण्याची भीती
By admin | Published: May 23, 2017 01:43 AM2017-05-23T01:43:24+5:302017-05-23T01:43:24+5:30
ठाण्यासह नव्या शासन निर्णयानुसार अनधिकृत आणि धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना पर्यायी जागा देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यासह नव्या शासन निर्णयानुसार अनधिकृत आणि धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना पर्यायी जागा देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार आता याच निर्णयाचा आधार घेऊन पावसाळ्यापूर्वी अशा प्रकारे इमारती खाली करुन त्या पाडण्याची कारवाई ठाणे महापालिका सुरु करणार आहे. त्यानुसार पालिकेने शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा सर्व्हे पूर्ण केला आहे. यामध्ये ३६९३ या इमारती धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सी -१ अर्थात अतिधोकादायक इमारतींची संख्या ही ६९ एवढी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या २० ने कमी झाली आहे. त्यानुसार आता या इमारती रिकाम्या करुन त्या तत्काळ तोडण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
गेल्या वर्षी पालिकेने शासनाच्या नव्या धोरणानुसार सर्व्हे केला असता, शहरात ३ हजार ६११ धोकादायक आणि ८९ अतिधोकादायक इमारती ठरल्या होत्या.
ठामपाच्या सर्व्हेत शहरात ३ हजार ६९३ धोकादायक आणि ६९ अतिधोकादायक इमारती आहेत. नव्या धोरणानुसार अतिधोकादायक, राहण्या अयोग्य व तत्काळ निष्कासित करणे अशा सी - १ प्रकारामध्ये शहरातील एकूण ६९ इमारतींचा समावेश असून यामध्ये सर्वाधिक म्हणजे ३२ इमारती या नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत असल्याची माहितीही या सर्व्हेतून समोर आली आहे. त्याखाली मुंब्रा प्रभाग समितीमध्ये १०, उथळसर आणि कोपरी प्रत्येकी ०७, वर्तकनगर, माजिवडा- मानपाडा प्रत्येकी ०४, कळवा ०२ अशी संख्या असतांना वागळे आणि लोकमान्यनगर सारख्या गजबजलेल्या भागात एकही इमारत अतिधोकादायक नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तर सी २ ए प्रकारात (इमारती रिकाम्या करुन संरचनात्मक दुरुस्ती करणे) ९१.
सी २ बी प्रकारात (इमारती रिकाम्या न करता रचनात्मक दुरुस्ती) १६६४.
सी ३ प्रकारात (इमारतींची किरकोळ दुरुस्ती) १८६९ एवढी संख्या आहे.