भिवंडीतील खासगी रुग्णालयांकडून ३६ लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:41 AM2021-05-13T04:41:10+5:302021-05-13T04:41:10+5:30
भिवंडी : कोविड काळात भयभीत झालेला रुग्ण मिळेल त्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यावर उपचाराच्या नावाखाली अनेक रुग्णांची लूट सुरू ...
भिवंडी : कोविड काळात भयभीत झालेला रुग्ण मिळेल त्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यावर उपचाराच्या नावाखाली अनेक रुग्णांची लूट सुरू असल्याची ओरड काही दिवसांपासून होत आहे. महापालिका प्रशासनाने रुग्णांची लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या बिलांची चौकशी करण्याची मोहीम हाती घेतली असून खासगी रुग्णालयांनी ३६ लाखांची लूट केल्याची बाब उघड झाली आहे. प्रशासनाने रुग्णालयांना नोटिसा बजावून जास्तीचे पैसे रुग्णांना परत करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्य सरकारने २१ मे २०२० मध्ये अधिसूचना काढून कोविड रुग्णालयातील सेवांचे दर निश्चित केले. त्यानंतरही अनेक रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले गेल्याने या बाबत भिवंडी पालिका आरोग्य विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. लेखा विभागांतर्गत स्थापन केलेल्या खासगी रुग्णालय नियंत्रण समितीने २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये खासगी रुग्णालय म्हणून मान्यता दिलेल्या २३ रुग्णालयातील एकूण १६४ रुग्णांच्या बिलांची तपासणी केली असता ३६ लाख ६७ हजार ७२० रुपयांची अतिरिक्त बिले रुग्णांना परतावा देण्याबाबतच्या नोटिसा बाजवण्यात आल्या असल्याची महिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के आर खरात यांनी दिली आहे.
२०२०-२१ या काळात शहरातील अनमोल हॉस्पिटल, ऑर्बिट हॉस्पिटल, सिराज हॉस्पिटल, एस.एस. हॉस्पिटल काल्हेर, काशीनाथ पाटील हॉस्पिटल, वेद हॉस्पिटल कोनगाव येथील १४९ रुग्णांच्या बिलांची तपासणी केली. त्यामध्ये ३३ लाख ९० हजार ७२० रुपयांची बिले ही अधिक रकमेची आढळली. त्यामध्ये एस. एस. हॉस्पिटल येथे सर्वाधिक ११ लाख २५ हजार ७७५ रुपयांची रक्कम रुग्णांना परतावा देण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.
---------------------------------------------------
नागरिकांना तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन
अनमोल, खातून बी काझी, ऑरेंज या तीन हॉस्पिटलमधील १५ रुग्णांच्या बिलामध्ये २ लाख ७७ हजार रुपयांची तफावत आढळली आहे. त्यामध्ये फक्त ऑर्बिट हॉस्पिटल यांनी ४० हजार ४०० रुपयांचा परतावा रुग्णांना दिला असून उर्वरित रुग्णांना तत्काळ परतावा देण्याबाबत नोटीस बजावण्यात आली असून नागरिकांनीही जे खासगी रुग्णालय अधिक पैसे उकळत आहेत त्या बाबतची तक्रार पालिका आरोग्य विभागाकडे लेखी स्वरूपात बिलाच्या छायांकित प्रतीसह करावी, असे आवाहन डॉ. खरात यांनी केले आहे.