ठाणे शहरात पुन्हा कोरोनाच्या ३६ रुग्णांची भर; महापालिका हद्दीत एकूण ८१ सक्रिय
By जितेंद्र कालेकर | Published: December 29, 2023 08:45 PM2023-12-29T20:45:42+5:302023-12-29T20:46:03+5:30
कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विलगीकरण कक्ष कार्यान्वित
ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. यात शुक्रवारी ही ३६ नवीन रुग्ण आढळून आले. सध्या एकूण ८१ सक्रिय रुग्ण ठाणे महापालिका हद्दीत .असून यातील एका रुग्णावर अति दक्षता विभागात उपचार करण्यात येत असून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या रुग्ण संख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. शहरात दिवसाला सुमारे दहा च्या आसपास रुग्ण आढळत आहेत. शुक्रवारी मात्र एकाच दिवशी ३६ रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा आता अधिकची सतर्क झाली आहे. सध्या ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ८१ कोरोना रुग्ण आहेत. यातील एका रुग्णावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.तर तिघांवर याच रुग्णालयातील कोरोना वार्ड मध्ये उपचार सुरु आहेत.
विशेष म्हणजे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी कळवा रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. तसेच पुरेसा औषध साठा, डॉक्टरांसह इतर टीम देखील सज्ज झाली आहे. कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अशा रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. त्याठिकाणी एकूण १९ बेड सज्ज ठेवले आहेत. त्यातील १५ साधे तर ४आयसीयू चे बेड आहेत. तसेच नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. सर्दी, खोकला ताप इत्यादीची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी. गरज पडल्यास कोरोना चाचणीही करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.