शाळा आणि विध्यार्थ्यांच्या मदतीला ३६०ट्रॅक चा ऑनलाईन प्लॅटफॉर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 04:16 PM2020-05-30T16:16:05+5:302020-05-30T17:18:27+5:30
ऑनलाइन शिक्षणासाठी फी न आकारणाऱ्या शाळांसाठी मोफत प्लॅटफॉर्म देण्यात येणार आहे.
ठाणे : कोरोनाच्या महामारीने सर्वांच्याच व्यवहार व वर्तनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. व्यक्तिगत संपर्क असो की, सार्वजनिक वावर; त्यावर निर्बंध आले आहेतच, शिवाय हे संकट कधीपर्यंत राहील याचा निश्चित अंदाजही बांधता येणारा नसल्याने शालेय शिक्षणावर देखील याचा परिणाम होताना दिसत आहे. कोरोनामुळे जगभरातील शाळांना आणि शिक्षकांना नवनव्या कल्पना वापरून पारंपरिक शिक्षणपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्याची संधी प्राप्त झाली आहे. अशा परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण हे अतिशय प्रभावी माध्यम ठरू शकते. आपल्या देशात स्मार्टफोन चे ५० कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. या सर्व बाबी लक्षात घेत ठाणे येथील 360ट्रॅक या संस्थेने ई-लर्न नावाचा सर्वसमावेशक ऑनलाईन प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.
कोरोनाच्या या संकटात विध्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अतिशय सृजनशीलतेने आणि अर्थपूर्ण पद्धतीने या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये शाळा - मग त्या मराठी माध्यमाच्या असोत की इंग्रजी माध्यमाच्या, स्टेट बोर्डाच्या असोत कि केंद्रीय बोर्डाच्या, अगदी महाविद्यालयापासून ते एखाद्या छोट्या कोचिंग क्लास पर्यंत सगळ्याच शैक्षणिक संस्थांना या प्लॅटफॉर्म चा वापर करता येणार आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर काहीही परिणाम न होता, त्यांना सहज व सोप्या पद्धतीने अभ्यास करता यावा, म्हणून आमच्या 360ट्रॅक या संस्थेने ई-लर्न ची निर्मीती केली असल्याचे संस्थेचे संस्थापक मयूर दाभाडे यांनी सांगितले. हा प्लॅटफॉर्म ज्या शाळा ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून फीस आकारणार नाहीत, त्यांच्यासाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचा 360ट्रॅक चा मानस आहे.
ई-लर्न प्लॅटफॉर्मवर विषय आणि पाठानुसार विडिओ, इमेज आणि पी डी एफ फाईल अपलोड करायची सोय आहे. तसेच, प्रत्येक पाठानंतर विध्यार्थ्यांना स्वयं-मूल्यांकनासाठी ऑनलाईन टेस्ट ची देखील सुविधा देण्यात आलेली आहे. याव्यतिरिक यामध्ये लाईव्ह कलासरूम ची संकल्पना देखील विकसित करण्यात आलेली आहे, जेणेकरून शिक्षक विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधू शकतात. सदर प्लॅटफॉर्म elearn.360track.in या लिंक वर उपलब्ध आहे.
360ट्रॅक ने मागील ४ वर्षांत त्यांच्या प्रॉडक्ट च्या माध्यमातून बऱ्याच शाळांना डिजीटाईज करण्याचे काम केलेले आहे. तसेच, देशभरातील ३० शहरांमध्ये 360ट्रॅक चे जाळे आहे. ऑनलाईन शिक्षण हा शालेय शिक्षणाला पर्याय होऊ शकत नाही, पण शिक्षणासाठी चे पूरक माध्यम म्हणून नक्कीच ई लर्निंग कडे बघता येईल, असे मत संस्थेचे अध्यक्ष संजय दाभाडे यांनी व्यक्त केले. ऑनलाइन शिक्षणातून मिळणारी स्वायत्तता आणि स्व-अध्ययन हीदेखील मोठी जमेची बाजू आहे, हे विसरता कामा नये. खरे तर प्रत्येक मुलाला वेगळ्या प्रकारच्या शाळेची आवश्यकता असते, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययनाची पद्धत वेगळी असते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीचे शालेय शिक्षण आणि ई-लर्निंग यांची सांगड घालणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.