महापालिकेत ३६०० पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:41 AM2021-07-30T04:41:33+5:302021-07-30T04:41:33+5:30

ठाणे : महापालिकेत मागील काही वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या कमी होत आहे. दुसरीकडे आकृतिबंधानुसार ...

3600 vacancies in NMC | महापालिकेत ३६०० पदे रिक्त

महापालिकेत ३६०० पदे रिक्त

Next

ठाणे : महापालिकेत मागील काही वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या कमी होत आहे. दुसरीकडे आकृतिबंधानुसार भरती आतापर्यंत काही प्रमाणात झाली आहे. त्यातही कोरोनामुळे शासनाकडून नवीन भरती प्रक्रियेला ब्रेक लावण्यात आल्याने, महापालिकेतील तब्बल ३६०० पदे रिक्त आहेत.

मागील काही वर्षांपासून महापालिकेत अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. मागील दोन वर्षांत अनेक अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने पालिकेत ५० टक्के कर्मचाऱ्यांची वानवा आहे. शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे पालिकेचा कारभारदेखील वाढला आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. विविध योजना पालिकेच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. परंतु या योजनांची पूर्ती करण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पालिकेत कर्मचारी, अधिकाऱ्यांची वानवा असल्याने वारंवार हेलपाटे घालावे लागत आहेत. काही अधिकाऱ्यांकडे, उपअभियंते, कार्यकारी अभियंते, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त यांच्यावर पाच - पाच विभागांचा कार्यभार असताना काहींकडे प्रभारी कार्यभारही सोपविण्यात आला आहे.

सध्या दर महिन्याला निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या १५ ते २० च्या घरात असून, ही गळती अशीच सुरू राहणार आहे. २०२० पर्यंत अर्ध्याहून अधिक पालिका रिकामी झाली आहे. दुसरीकडे पालिकेतील काही पदे भरण्यासाठी आकृतिबंध तयार केला होता. त्यानुसार हा प्रस्ताव २०११ मध्ये शासनाकडे पाठविला. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यात २०१९ मध्ये २०८५ पदे रिक्त होती. आता दोन वर्षांत त्यात आणखी भर पडली असून, ही संख्या ३६००वर गेली आहे. याचाच अर्थ दोन वर्षांत १५१५ कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. ही मोठी पोकळी असून, दर महिन्याला त्यात आणखी भर पडत आहे. दरम्यान, मे २०२० मध्ये झालेल्या शासन निर्णयामुळे नवीन पदांची भरती आता रखडली आहे. कोरोना काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील पदेच भरा, असे शासनाने स्पष्ट केले असल्याने नवीन पदांची भरती अद्यापही झालेली नाही.

..ही पदे आहेत रिक्त

वर्ग १- ११५

वर्ग २- १२५

वर्ग ३- १५४०

वर्ग ४- १७५४

Web Title: 3600 vacancies in NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.