३६५ महिलांची देहविक्रयातून सुटका
By admin | Published: July 20, 2015 03:22 AM2015-07-20T03:22:56+5:302015-07-20T03:22:56+5:30
लग्नाचे व पैशांचे आमिष, प्रेमजाळ्यात ओढून महिलांना देहविक्रीस भाग पाडले जाते. अशा प्रकारे त्यांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्यांवर कारवाईसाठी
लग्नाचे व पैशांचे आमिष, प्रेमजाळ्यात ओढून महिलांना देहविक्रीस भाग पाडले जाते. अशा प्रकारे त्यांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्यांवर कारवाईसाठी ठाणे पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभाग सुरू केला आहे. या विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने पिटा अॅक्टनुसार कारवाईस सुरुवात केली आहे.
गेल्या साडेतीन वर्षांत ६३ कारवाया करून सुमारे २१४ पुरुष आणि महिला आरोपींना अटक करून ३६५ पीडित महिलांची सुटका केली आहे. सर्वाधिक पीडित १२० महिलांची सुटका २०१४ मध्ये केलेल्या १६ कारवायांत केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यातून मुक्तता केलेल्या महिलांना एकतर सुधारगृहात पाठविण्यात येते किंवा त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केले जाते.
या महिलांना पैशांचे आमिष दाखवून किंवा ब्युटी पार्लरच्या व्यवसायातून वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जाते. पीडित महिला या प्रामुख्याने पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याचे तपासात पुढे आले आहे.
वेश्या व्यवसायासाठी आता व्हॉट्सअॅपच्या वापराबरोबर भाड्याच्या रूमही वापरल्या जात आहेत. त्यामुळे भाड्याने घर देणाऱ्यांनी तेथे काय चालते, याची पाहणी करावी. हा व्यवसाय करून घेणाऱ्या २३ महिलांना यंदा पकडले आहे.
- शकील शेख,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक विभाग, ठाणे
जाहिराती देऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्यांनी आता चक्क व्हॉट्सअॅपचा आसरा घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या व्यवसायाकडे महिलांना ओढण्यासाठी वेगवेगळी आमिषे दाखविणाऱ्या २१४ जणांच्या पोलिसांनी मागील साडेतीन वर्षांत मुसक्या आवळल्या असून त्यामध्ये ४८ महिलांचाही समावेश आहे. यातून ३६५ पीडित महिलांची सुटका केली आहे. सद्य:स्थितीत भाड्याच्या रूमचाही या व्यवसायासाठी वापर होत असल्याने आपली रूम भाड्याने देणाऱ्यांनी तेथे काय चालते, याची तपासणी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संकलन : पंकज रोडेकर