गुढी पाडव्यानिमित्त ३६८ व्या कट्टा उजळला रोषणाईने, अभिनय कट्टयावर आगळावेगळा दीपोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 04:29 PM2018-03-19T16:29:59+5:302018-03-19T16:29:59+5:30
अभिनय कट्टयावर ठाण्यातील दिवंगत धर्मवीर आनंद दिघे, रामभाऊ म्हाळगी , डॉ वा. ना. बेडेकर , खंडू रांगणेकर , राम मराठे ,मुग्धा चिटणीस , पांडुरंगशास्त्री आठवले , चंदू पारखी , पी. सावळाराम यांना नववर्षाच्या सुरुवातीलाच दीपोत्सवाने वंदन करण्यात आले.
ठाणे : गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणार सण अर्थात मराठी नववर्षारंभ. यानिमित्ताने अनेक ठिकाणी शोभा यात्रांनी सुरू झालेली पाडव्याची पहाट, मराठी नववर्षाची शोभा वाढवत होती आणि ठाण्यातील संध्याकाळ सुद्धा नयनरम्यय झाली होती ती म्हणजे अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी साजरा केलेल्या दीपोत्सवामुळे.
३६८ व्या कट्ट्याची सुरवात ही प्रथेप्रमाणे प्रार्थनेने झाली आणि.इतनी शक्ती हमे देना दाता चे स्वर आसमंतात दरवळले आणि प्रसन्नमय वातावरणात कार्यक्रमास आरंभ झाला. सर्व प्रथम अभिनय कट्टयावर नव्याने सुरू झालेल्या संगीत कट्ट्याच्या कलाकारांनी आपल्या गाण्यांद्वारे ही प्रसन्नता अबाधित राखली ज्या मध्ये विनोद पवार यांनी विठू माऊली तर निशा पांचाळ यांनी ऐरणीच्या देवा तुला हे गाणं गाऊन रसिकांची मने जिंकली. ज्ञानेश्वर मराठे यांनी गायलेले देहाची तिजोरी या गाण्याने वातावरण भक्तीमय केले पाडव्याच्या शुभेच्छा देत राजू पांचाळ यांनी शोधिसी मानवा हे गाणं गायले.पुढे संगीत कट्ट्याचा कलाकार प्रणव कोळी यांनी गिटार च्या सोबतीने मन उधाण वाऱ्याचे हे मनाला भिडणारे गाणे पेश करून रसिकांच्या काळजात घर केले. गिटार वरच्या त्याच्या अदाकारीला प्रेक्षकांनी भरघोस टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. यानंतर पाडव्याच्या निमित्ताने आयोजित दीपोत्सवास सुरवात झाली. तत्पूर्वी या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांची होती ते कट्ट्याचे अध्यक्ष दिग्दर्शक किरण नाकती यांनी प्रेक्षकांशी संवाद साधत येणारे संपूर्ण वर्ष हे या दिव्यांप्रमाणेच तेजोमय असायला हवे अशी प्रार्थना रंगदेवते चरणी केली आणि सर्वांच्याच निरोगी आयुष्याची मागणी विधात्याकडे करत उपस्थितांना पाडव्याच्या गोड शुभेच्छा दिल्या. राम वनवासातून आल्या नंतर गुढ्या उभारल्या गेल्याची कथा आपल्याकडे ऐकावयास मिळते. गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर किरण नाकती यांच्या संकल्पेनुसार ठाण्यातील ९ विविध क्षेत्रातील दिवंगत थोर व्यक्तींच्या नावे एकेक दिवा लावून दीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली. परंतु या प्रत्येकाच्या नावे लावण्यात आलेला प्रत्येक दिवा आपल्या बालकलाकारांनी साकारलेल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेमार्फत लावण्यात आला. प्रभु श्रीरामचंद्र (श्रेयस) यांनी धर्मवीर आनंद दिघे , लक्ष्मण (अखिलेश जाधव) यांनी रामभाऊ म्हाळगी , सीता (पूर्वा)यांनी डॉ वा. ना. बेडेकर , हनुमान(अद्वैत )याने खंडू रांगणेकर , भगत सिंग ( निमिष भगत) यांनी राम मराठे ,झाशीची राणी (सानवी) यांनी मुग्धा चिटणीस , गाडगे बाबा (निमिष) यांनी पांडुरंगशास्त्री आठवले , तुकाराम महाराज(चिन्मय)यांनी चंदू पारखी , सिंधुताई सकपाळ (प्रांजल धरला) यांनी पी. सावळाराम यांच्या नावे दीपप्रज्वलन करून यांच्या कार्याचा दीपोत्सवाच्या माध्यमातून सन्मान केला. रंगमंचावरील प्रमुख दीप प्रज्वलन पार पडल्या नंतर कट्ट्याच्या परिसरात मांडले गेलेले सर्वच दिवे हे उपस्थित रसिकांनी प्रज्वलित केले आणि या दीपोत्सवात हिरीरीने शामिल झाले. असंख्य दिव्यांच्या या प्रकाशमय वातावरणात कट्ट्याचा परिसर उजळून निघाला. आणि याच प्रसंगावर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कट्ट्याच्या निवेदनाची धुरा कलाकार वीणा छत्रे हिने लीलया पार पडली.