मालमत्ताकरातून तिजोरीत ३७ कोटींचा महसूल जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 12:40 AM2020-10-06T00:40:45+5:302020-10-06T00:40:52+5:30

मीरा-भाईंदर महापालिकेला आधार : ८० हजार ५०० नागरिकांनी केला भरणा

37 crore revenue collected from property tax | मालमत्ताकरातून तिजोरीत ३७ कोटींचा महसूल जमा

मालमत्ताकरातून तिजोरीत ३७ कोटींचा महसूल जमा

Next

- धीरज परब

मीरा रोड : कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या मीरा-भार्इंदर महापालिकेला शहरातील ८० हजार ५०० मालमत्ताधारक नागरिकांनी मोठा दिलासा दिला आहे. या करधारक नागरिकांनी जेमतेम दोन महिन्यांत तब्बल ३७ कोटी १४ लाखांचा मालमत्ता कर पालिका तिजोरीत जमा केला आहे. त्यामुळे पालिकेला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

मार्चअखेरपासून कोरोनामुळे मालमत्ता कराची देयकेच नागरिकांना दिली गेली नव्हती. त्यामुळे पालिकेची करवसुली ठप्प झाली होती. एकीकडे कोरोनाच्या प्रभावामुळे पालिकेचे आर्थिक उत्पन्न जवळपास ठप्प असताना कोरोनासाठीचा वाढता खर्च आणि प्रशासकीय खर्च यामुळे पालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. आर्थिक चणचणीत सापडलेल्या महापालिकेला आधार देण्याचे काम शहरातील प्रामाणिक करदात्या नागरिकांनी केले आहे.

पालिकेच्या करविभागाच्या नोंदीनुसार शहरात तीन लाख ५७ हजार मालमत्ता खातेदार आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षात कराची मागणी २७१ कोटी रुपये इतकी आहे. पण, कोरोनामुळे एप्रिलपासून पालिकेने करवसुली तर सोडाच कराची बिलेही काढली नव्हती. आॅगस्टपासून नागरिकांना मालमत्ता कराची देयके देण्यास सुरुवात झाली. तर १३ आॅगस्टपासून पालिकेने करवसुली सुरू केली. कोरोनामुळे याला किती प्रतिसाद मिळेल हा प्रश्न होता. पण १३ आॅगस्टपासून रविवार ४ आॅक्टोबरपर्यंत तब्बल ८० हजार ५०० करदात्या नागरिकांनी ३७ कोटी १४ लाख रुपये इतका मालमत्ताकर भरला आहे.

३० हजार नागरिकांनी भरला आॅनलाइन कर
करदात्यांपैकी ३० हजार जणांनी १३ कोटी ५४ लाखांचा कर आॅनलाइन भरला आहे. तर ५० हजार ५०० नागरिकांनी प्रत्यक्ष पालिका कार्यालयांमध्ये जाऊन कर भरणा केला आहे. ती रक्कम २३ कोटी ६० लाख रुपये इतकी आहे. पहिल्या बिलाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती.

पण देयके एक महिना उशिरा वाटप करण्यात आल्याने आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी नागरिकांना नाहक व्याज लागू नये म्हणून कर भरण्याची मुदत एका महिन्याने म्हणजेच ३१ आॅक्टोबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ३१ आॅक्टॉबरनंतर कर भरल्यास त्यावर व्याज आकारले जाणार आहे.

Web Title: 37 crore revenue collected from property tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.