भाईंदरच्या रुग्णालयात ३ महिन्यांत ३७ मृत्यू
By धीरज परब | Published: August 16, 2023 11:01 AM2023-08-16T11:01:30+5:302023-08-16T11:01:43+5:30
ओपीडीचा आधार नागरिकांना मिळतो.
धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड : शासनाच्या भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात एप्रिल ते जून या ३ महिन्यांत ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. २०० खाटांच्या रुग्णालयात गंभीर स्वरूपातील रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया होत नाहीत. ओपीडीचा आधार नागरिकांना मिळतो.
रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरच नसल्याने, गंभीर स्वरूपाच्या आजारांवर उपचार, शस्त्रक्रियाच होत नाहीत. आयसीयू विभाग आहे, पण डॉक्टर नाहीत. रुग्णालयात ३६५ पदे मंजूर आहेत, प्रत्यक्षात २०० ते २५० कार्यरत आहेत. खासगी डॉक्टरांचे शुल्क परवडत नसल्याने, जोशी रुग्णालयातील ओपीडीला मात्र रुग्णांची मोठी गर्दी असते. रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जून या ३ महिन्यांत ३२ हजार ८३४ रुग्णांनी ओपीडीमध्ये तपासणी करून औषध-उपचार घेतले आहेत. या तीन महिन्यांत लहान-सहान ४९७ शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत, तर मेजर स्वरूपाच्या १२८ सर्जरी करण्यात आल्या. २७३ रुग्णांना उपचारासाठी अन्य ठिकाणी पाठवले.