क्रिप्टो करन्सीच्या खरेदी-विक्रीतून जादा परताव्याच्या प्रलोभनाने ३७ लाखांचा गंडा

By जितेंद्र कालेकर | Published: July 14, 2023 09:07 PM2023-07-14T21:07:38+5:302023-07-14T21:07:45+5:30

सेलिब्रिटीचे खाते लाइक करण्याचेही आमिष : शोधासाठी पोलिसांची दाने पथके

37 Lakhs looted with the lure of extra returns from crypto currency trading | क्रिप्टो करन्सीच्या खरेदी-विक्रीतून जादा परताव्याच्या प्रलोभनाने ३७ लाखांचा गंडा

क्रिप्टो करन्सीच्या खरेदी-विक्रीतून जादा परताव्याच्या प्रलोभनाने ३७ लाखांचा गंडा

googlenewsNext

ठाणे: इन्स्टाग्रामवरील सेलिब्रेटींच्या खात्यांना लाइक करण्याबरोबरच क्रिप्टो करन्सीच्या प्रीपेड टास्क प्लॅनमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास क्रिप्टो करन्सीच्या खरेदी-विक्रीतून जास्त परतावा मिळेल, या प्रलोभनापोटी चौघांनी तरुणाला ३७ लाखांचा गंडा घातल्याची घटना अलीकडेच उघड झाली. यातील आरोपींच्या शोधासाठी दोन पथकांची निर्मिती केल्याची माहिती शीळ डायघर पोलिसांनी शुक्रवारी दिली.

नोकरीच्या शोधात असलेल्या डायघर भागातील ३२ वर्षांच्या तरुणाला नोकरीबाबत काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपवर मेसेज आला होता. त्याने चौकशी केल्यानंतर मीरा नामक महिलेने त्याला इन्स्टाग्रामवर सेलिब्रेटींच्या खात्यांना लाइक करण्यास सांगितले. यात प्रत्येक लाइक मागे ७० रुपये देण्यात येतील, असे सांगण्यात आले. ही नोकरी केल्यास दररोज दोन हजार ते तीन हजार रुपये मिळतील, अशी बतावणी केली. चांगली रक्कम मिळेल, या आशेपोटी तो नोकरीसाठी तयार झाला.

या कामासाठी त्याला सुरुवातीला २१० रुपये मिळाले. नंतर त्याला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये घेण्यात आले. त्याला सेलिब्रेटींच्या खात्यांना लाइक करण्याच्या कामाबरोबरच क्रिप्टोकरन्सीच्या प्रीपेड टास्कचीही माहिती देण्यात आली. या टास्कमध्ये जितक्या जास्त रकमेची गुंतवणूक करून क्रिप्टो करन्सी विकत घेऊन खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्यास मोठा परतावा देण्याचे प्रलोभनही या तरुणाला दाखविण्यात आले. यातूनच त्याने सुरुवातीला नऊ हजार रुपयांची गुंतवणूक केली. तरुणाने टास्क प्रमाणे खरेदी-विक्री केल्यानंतर तरुणाला ९८० रुपयांचा फायदा झाला. नंतर त्याने ३० हजारांचा टास्क निवडला. या टास्कमध्येही त्याला ८ हजार २०० रुपयांचा फायदा मिळाला.

अशाच प्रकारे त्याला पैशाची गुंतवणूक करण्याचे टास्क देत चार तरुणांनी त्याच्याकडून ३७ लाख रुपये ऑनलाइन उकळले. त्यानंतर मात्र त्याला जादा रक्कम किंवा परतावाही देण्यात आला नाही. उलट ३७ लाखांची मुद्दलही फसवणुकीने लाटल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणाने डायघर पोलिस ठाण्यात मीरा, सेरिन, विकास खान आणि अन्य एक अशा चौघांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि फसवणुकीच्या कलमाखाली ११ जुलै २०२३ रोजी गुन्हा दाखल केला.

दोन पथकांकडून होणार तपास-
या फसवणुकीच्या प्रकारात आंतरराज्य टोळी कार्यरत असण्याची शक्यता असून यातील आरोपींच्या शोधासाठी दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या दोन पथकांची निर्मिती केल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

Web Title: 37 Lakhs looted with the lure of extra returns from crypto currency trading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.