३७ चौक होणार चकाचक; ठाणे महापालिका करणार नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:12 AM2020-01-04T00:12:12+5:302020-01-04T00:12:21+5:30
शहर खड्डेमुक्त करण्याचा संकल्प
ठाणे : शहरातील रस्ते चकाचक करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार, मागील महासभेत तब्बल १७१ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यांबरोबरच शहरातील ३७ चौक खड्डेमुक्त करण्याची महापालिकेने तयारी सुरू केली आहे. यानुसार, तीनहातनाका, नितीन कंपनी आदींसह १२ चौकांचे मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने तर शहरातील २५ चौकांचे यूटीडब्ल्यूटी पद्धतीने सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
महापालिका क्षेत्रात ३५६ किमीचे रस्त्यांचे जाळे आहे. मात्र, प्रत्येक पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसून येत असते. रस्त्यांची संख्या कमी असली, तरी शहराची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्या वेगाने वाहनांची संख्यादेखील तितकीच वाढत आहे. वाहनांच्या तुलनेत रस्ते अपुरे पडू लागल्याने प्रशासनाकडून रस्ते रुंदीकरण मोहीम राबविली जात आहे. नव्या वर्षातही रस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याचबरोबर विकास आराखड्यातील रस्ते तयार करण्याची कामेही हाती घेतली आहेत. शहर खड्डेमुक्त राहावे म्हणून सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार केले जात आहेत. असे असले तरी दरवर्षी पावसाळ्यात शहरातील डांबरी रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये खड्डे पडत असल्याचे चित्र दिसून येते. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी होते. या पार्श्वभूमीवर सर्वच चौकांना खड्डेमुक्त करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.
या चौकांचा आहे समावेश
यात कॅडबरी चौक, तीनहातनाका चौक, नितीन कंपनी चौक, माजिवडा परिसरातील पाच चौक, गोयंका चौक, गोखले मार्गावरील चौक आणि आर मॉलजवळील चौक अशा १२ चौकांमध्ये मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने कामे करण्यात येणार आहेत. तर, स्वामी विवेकानंद चौक, टेंभीनाका चौक, चिंतामणी चौक, कोर्टनाका चौक, जेल तलाव चौक, नरवीर तानाजी चौक, गडकरी चौक, डॉ. आंबेडकर चौक, माजिवडा जंक्शन, ब्रह्मांड आझादनगर चौक.
मानपाडा जंक्शन, पातलीपाडा जंक्शन, सरस्वती शाळेसमोरील चौक, यशोधननगर चौक, क्र ांतिवीर चौक, मुंब्रा पोलीस स्थानक चौक, संजयनगरनाका, शंकर मंदिरनाका, किस्मत कॉलनी चौक, कौसा कबरस्तान चौक, अॅक्रोड कॉम्प्लेक्स चौक, हिलन बेकरी चौक, पाकिजा बेकरी चौक, सनशाइननगर चौक अशा २५ चौकांत यूटीडब्ल्यूटी पद्धतीने नूतनीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.