ठाणे जिल्ह्यात दहा दिवसांत ३७९ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:42 AM2021-04-23T04:42:42+5:302021-04-23T04:42:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासोबत मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासोबत मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या १० दिवसांत ४५ हजार २५३ रुग्णांसह मृतांची संख्या ३७९ ने वाढली आहे. रुग्णसंख्या वाढत असतानाच त्यात मृतांची भर पडत असल्याने जिल्हा प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून बुधवारी रात्रीपासून कडक संचारबंदी सुरू झाली. त्यामुळे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या मोठ्या शहरांसह उल्हासनगर, भिवंडी, मीरा- भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ परिसरात सध्या स्मशानशांतता गुरुवारपासून सुरू झाली. जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आलेख गेल्या १५ दिवसांपासून हजार ते पंधराशेने कमी झाला आहे. यावर समाधान मानले जात असतानाच मृतांचा आकडा मात्र झपाट्याने वाढला आहे. गेल्या १० दिवसांत ३७९ मृताची भर पडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना मृतांची संख्या आता ७ हजार ३१ झाली आहे. जिल्ह्यातील या १० शहरात दिवसाकाठी मृतांची संख्या कमीत कमी ३० मृतांच्या सरासरीने वाढत आहे. त्यामुळे चिंतेत भर पडून गुण्यागोविंदाने नांदणा-या या शहरांमध्ये आपापसातील चिडचिडेपणा वाढला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के आहे. आतापर्यंतच्या ४ लाख २५ हजार ९८७ रुग्ण संख्येपैकी जिल्ह्यात ३ लाख २२ हजार ३७८ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ७ हजार ३१ या मृतांमध्ये गेल्या १० दिवसांत ३७९ मृतांची भर पडून मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढली. या मृतांमध्ये मीरा -भाईंदर महापालिका क्षेत्रातील सर्वाधिक गेल्या १० दिवसांत ८६ मृतांचा आलेख चढता राहिलेला आहे. या खालोखाल ठाणे शहर परिसरात ७२ मृत्यू आणि नवी मुंबईत ७१ मृत्यू अवघ्या १० दिवसात झाले आहे. याशिवाय कल्याण-डोंबिवली परिसरातही ५० मृत्यू झाले आहेत. उल्हासनगर, अंबरनाथला प्रत्येकी २५ मृत्यू झाले. कुळगाव-बदलापूर १९ आणि जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये २३ मृतांची नोंद अवघ्या १० दिवसांत झाली आहे.
-------