मुंबई-ठाण्यात तस्करीसाठी जाणारी ३८ लाखांची सुगंधी तंबाखू अन् पान मसाला भिवंडीत हस्तगत
By जितेंद्र कालेकर | Published: December 26, 2022 10:26 PM2022-12-26T22:26:02+5:302022-12-26T22:26:28+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
ठाणे: राज्य शासनाने बंदी घातलेली सुगंधी तंबाखू आणि पान मसाल्याचा ३८ लाख ५५ हजार ६०० रुपयांचा साठा ठाण्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने भिवंडीतून सोमवारी हस्तगत केला आहे. बंदी असलेला तंबाखूजन्य पदार्थ मुंबई ठाण्यात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दोन वाहनांसह ८० लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नामांकित कंपनीचा पान मसाला तसेच सुगंधी तंबाखू भिवंडीतील कशेळी येथील कचरा डेपोवर तसेच उल्हास नदी आणि खाडीच्या तीरावर उतरविण्यात आला आहे. तो मुंबई, ठाणे, भिवंडी, मिरा भाईंदर आणि नवी मुंबई येथे वितरीत आणि विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती ठाण्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त अभिमन्यू काळे, सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार, कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्तवार्ता अन्नसुरक्षा अधिकारी अरविंद खडके आणि राम मुंडे यांच्या पथकाने हा ३८ लाख ५५ हजारांचा साठा आणि दोन वाहने भिवंडीतील कशेळी खाडीजवळ पकडली.
याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात अलीहुसेन सुलेमान शैख (३२, रा. शिवडी, मुंबई ) या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरा वाहन चालकचालक मात्र तिथून सोडून पळून गेला. या प्रकरणातील पुरवठादार, वाहनमालक व इतर सामील व्यक्तींचा तपास होण्यासाठी कारवाई सुरु केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली.