ठाणे शहर पोलिसांच्या ६८६ जागांसाठी ३८ हजार अर्ज

By जितेंद्र कालेकर | Published: June 17, 2024 07:50 PM2024-06-17T19:50:22+5:302024-06-17T19:50:29+5:30

* ग्रामीणची मुंब्य्रात तर शहरची साकेत मैदानावर होणार भरती प्रक्रीया

38 thousand applications for 686 posts of Thane City Police | ठाणे शहर पोलिसांच्या ६८६ जागांसाठी ३८ हजार अर्ज

ठाणे शहर पोलिसांच्या ६८६ जागांसाठी ३८ हजार अर्ज

ठाणे:ठाणे शहर पोलिसांच्या ६८६ जागांसाठी ३८ हजार उमेदवारांचे अर्ज आले आहेत. ही भरती प्रक्रीया ठाण्यातील साकेत मैदानावर हाेणार असून त्यासाठी उमेदवारांना वैद्यकीय तसेच इतर सुविधा उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी दिली. ठाणे ग्रामीणच्या ११९ जागांसाठी आठ हजार ३४ उमेदवारांचे अर्ज आले असून ही भरती प्रक्रीया मुंब्रा येथील मैदानावर १९ जून पासून सुरु होणार असल्याचे ग्रामीणचे अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी सांगितले.

ठाणे शहर दलात अंमलदारांची ६६६ तर चालकांची २० पदे आहेत. त्याच २०२२-२०२३ ची भरती प्रक्रीया ५ मार्च २०२४ पासून सुरु झाली आहे. मार्च ते १५ एप्रिल या कालावधीमध्ये पात्र उमेदवारांचे अर्ज घेण्यात आले. आतापर्यंत कॉन्स्टेबलच्या ६६६ जागांसाठी ३० हजार १५५ पुरुष तर सात हजार ९२३ तरुणींनी असे एकूण ३८ हजार ७८ उमेदवारांनी अर्ज केले. चालकांच्या २० जागांसाठी एक हजार ४०८ पुरुष तर ११९ तरुणींनी अर्ज भरले. या ११९ मधून अवघ्या सात तरुणींची चालक पदासाठी निवड हाेणार आहे. ठाणे शहर पोलिसांच्या साकेत मैदानावर उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. ही भरती प्रक्रीया २७ जुलै पर्यंत सुरु राहणार आहे.

पावासाळी मंडपाची सुविधा-
ठाणे शहरच्या भरतीसाठी उमेदवारांना मैदानात बसण्यासाठी पावसाळी मंडप टाकले आहेत. याठिकाणी वैद्यकीय सुविधाही पुरविल्या जाणार आहेत. मैदानी चाचणीसाठी साकेत पोलिस मैदानावर १०० मीटर स्टॅक तसेच गोळाफेकसाठी सात मैदान तयार केले आहेत. तर बाळकूम येथे १६०० मीटर धावणे ही मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. याठिकाणी भरतीच्या वेळी ही प्रक्रीया राबविण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १०० अधिकारी आणि ५०० पोलिस कर्मचारी तसेच ७० मंत्रालयीन कर्मचारी तैनात केल्याचीही माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त जाधव यांनी दिली.
....................
पावसामुळे एखादे दिवशी जर चाचणी होऊ शकली नाही तर उमेदवारांना ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिस दलाकडून पुढील योग्य तारीख दिली जाणार आहे. वेगवेगळया पदांसाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याचे पत्र मिळते. अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाणार आहे.
...............
ठाणे ग्रामीणसाठी आठ हजार ३४ अर्ज-
ठाणे ग्रामीण पोलिस दलाची भरती प्रक्रीया मुंब्रा येथील ठाणे महापालिकेच्या डॉ. मौलाना अब्दुल कलाम क्रीडा संकुलात होणार आहे. याठिकाणी मैदानी चाचणीसाठी १६०० आणि ८०० मीटरचा सिथेटीक ट्रॅक उपलब्ध आहे. तसेच १०० मीटरचा वॉटर प्रफींग ट्रॅकही तयार केला आहे. १९ जून ते १ जुलै २०२४ पर्यंत ही भरती प्रक्रीया राहणार आहे. ग्रामीणच्या ११९ जागांसाठी सात हजार १९ पुरुषांचे तर एक हजार १५ महिलांचे अर्ज आले आहेत. अधीक्षक यांच्यासह १५० पोलिस अधिकारी कर्मचारी ही भरती प्रक्रीया पूर्ण करणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. बनावट प्रमाणपत्र किंवा कोणतेही मादक पदा सेवन केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई हाेणार असल्याचेही ते म्हणाले.
......................
ठाणे शहर पोलिसांच्या ६८६ जागांसाठी होणारी भरती प्रक्रीया राबविण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १०० अधिकारी आणि ५०० पोलिस कर्मचारी तसेच ७० मंत्रालयीन कर्मचारी तैनात केले आहेत. संजय जाधव, अतिरिक्त पोलिस आयुक्त (प्रशासन), ठाणे शहर

Web Title: 38 thousand applications for 686 posts of Thane City Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.