जिल्ह्यातील 3,837 ग्राहक सहा महिन्यांपासून मीटरविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 01:39 AM2021-02-07T01:39:21+5:302021-02-07T01:39:53+5:30

पालघरमध्ये महावितरणकडे वीजमीटरचा तुटवडा; ग्राहक त्रस्त

3,837 customers in the district without meters for six months | जिल्ह्यातील 3,837 ग्राहक सहा महिन्यांपासून मीटरविना

जिल्ह्यातील 3,837 ग्राहक सहा महिन्यांपासून मीटरविना

Next

- हितेन नाईक

पालघर/सफाळे : पालघर महावितरण विभागातील सहा तालुक्यांतील सिंगल आणि थ्री फेज विद्युत मीटर्ससाठी सुमारे ३ हजार ८३७ ग्राहकांनी पैसे भरले असताना मागील ५ ते ६ महिन्यांपासून मीटर्स उपलब्ध करून दिले जात नाहीत. खाजगी दुकानदारांकडून मीटर्स लावण्याची परवानगी महावितरण विभागाने दिली असली तरी बाजारातले मीटर्सही गायब झाल्याने अनेक कुटुंबीयांना अंधारात राहावे लागत आहे.

पालघर महावितरण विभागांतर्गत पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, अशी सहा तालुके येत असून, पालघर तालुक्यातील पालघर उपविभागांतर्गत १,०६०, बोईसर ग्रामीण ९२७, एमआयडीसी १४६, सफाळे २३२, अशा २ हजार ३६५ ग्राहकांनी मीटर्सची मागणी केली आहे, तर डहाणू ३३६, जव्हार १८८, तलासरी ६३०, मोखाडा ७५, विक्रमगड २४३, अशा एकूण ३ हजार ८३७ ग्राहकांनी नवीन मीटर्ससाठी मागील ६ महिन्यांपासून मागणी अर्ज सादर केले आहेत. मोठ्या कष्टाने घर, दुकान बांधले असताना, फ्लॅट विकत घेतले असताना वीजपुरवठ्यासाठी मीटर मिळत नसल्याने हजारो घरात लाइटच नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जाण्याची पाळी कुटुंबांवर आली आहे. या ३ हजार ८३७ ग्राहकांनी नवीन मीटरसाठी मागील ६ महिन्यांपूर्वी पैसे भरले आहेत. एक दिवस उशिरा बिल भरल्यावर त्यांना दंड वसूल करणारा महावितरण ६ महिन्यांपासून लाखो रुपये वापरत असून, व्याजरूपाने भरपाई देणार आहे का? असा सवाल ग्राहकांनी केला आहे. ग्राहकांनी मीटरसाठी कार्यालयाचे अनेक हेलपाटे सुरू असून, तुम्ही दुकानदारांकडून मीटर खरेदी करून बिले सादर करा, तुमच्या बिलामधून ते वजा करू, असे महावितरणकडून सांगितले जात आहे.

दोन महिन्यांपासून वीज मीटर उपलब्ध नसल्याने ग्राहकांना फेऱ्या मारायची वेळ आली आहे. मीटर ग्राहकांना उपलब्ध करून देणे महावितरण विभागाचे काम आहे.
-अमोद जाधव, सरपंच, उंबरपाडा, सफाळे

वीज मीटरची मागणी करण्यात आली असून, मीटर उपलब्ध झाल्यास देण्यात येतील. मीटरचा तुटवडा असल्याने ग्राहकांनी बाहेर खरेदी करून मीटर घ्यावे, त्या वीज मीटरचे पैसे बिलामधून कमी करण्यात येतील.
-प्रताप मचिये, कार्यकारी अभियंता, पालघर

Web Title: 3,837 customers in the district without meters for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज