कोकणात ३८,६५८ कोरोना रुग्ण सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:40 PM2020-09-25T23:40:50+5:302020-09-25T23:41:03+5:30

कोकण आयुक्तांची माहिती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

38,658 corona patients were found in Konkan | कोकणात ३८,६५८ कोरोना रुग्ण सापडले

कोकणात ३८,६५८ कोरोना रुग्ण सापडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत सरासरी २५ टक्के आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. विभागाची लोकसंख्या एक कोटी ९२ लाख ७२ हजार ६५ असून, ४८ लाख ६६ हजार ३७२ कुटुंबसंख्या आहे.यासाठी सात हजार ४२५ पथकांपैकी सहा हजार ७२१ पथकांनीदररोज दोन लाख १७ हजार ५९४ कुटुंबांना भेटी दिल्या. शुक्रवारअखेर ही संख्या १० लाख ६४ हजार १४३ एवढी असून या भेटींदरम्यान एक हजार ४९३ तापाचे रुग्ण, तर ३८ हजार ६५८ कोरोनासदृश रुग्ण आढळल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी शुक्रवारी दिली.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील अधिकाऱ्यांसोबत माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आढावा घेतला. कोकण विभागात सहा हजार ७८० आॅक्सिमीटर आवश्यक असून यापैकी सहा हजार ४२९ आॅक्सिमीटर उपलब्ध आहेत. तर, आवश्यक सहा हजार ६६६ थर्मल स्कॅनरपैकी सहा हजार ६०२ थर्मल स्कॅनर उपलब्ध झाले असल्याचे मिसाळ म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोकणातील कामाबाबत समाधान व्यक्त करून ही मोहीम गावपातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी या योजनेचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला.


वैद्यकीय अधिकाऱ्यांना ट्रीटमेंट करताना काही अडचण असल्यास टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी, ग्रामपंचायत पातळीवर अधिक लोक सहभागी होतील, याकडे लक्ष द्यावे. प्रचारप्रसिद्धीसाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. कोकण भवन येथे झालेल्या या बैठकीस नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग, कोकण पोलीस महानिरीक्षक निकीत कौशिक उपस्थित होते.


रुग्ण दुपटीचा वेग ५५ दिवसांवर
कोकण विभागात या मोहिमेंतर्गत घरोघरी जाऊन तपासणी, क्लोज कॉन्टॅक्टचा शोध आणि प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्ण दुपटीचा वेग ५५ दिवसांवर आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मोहिमेंतर्गत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. यात पालघर जिल्ह्यात वारली पेंटिंग आणि वारली भाषेमध्ये प्रसिद्धी, सिंधुदुर्गमध्ये दशावताराच्या माध्यमातून, रत्नागिरी जिल्ह्यात गुडी महोत्सव आणि महापालिकेंतर्गत ४० जाहिरात फलके, पाच कमानी, १०० बसस्टॉप आणि ७५ बसवर प्रसिद्ध केली आहे. रायगड जिल्ह्यात पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदा घेण्यात आल्या होत्या.

तीन जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित
या बैठकीत पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, पालक सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा कोरोना टास्क फोर्सच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.

Web Title: 38,658 corona patients were found in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.