सोळावी पक्षिगणना : जून महिन्यात आढळले १०३ जातींचे ३९३४ पक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 04:23 AM2018-06-14T04:23:16+5:302018-06-14T04:23:16+5:30
पर्यावरण दक्षता मंडळ व होप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणे पक्षिगणनेची सोळावी फेरी रविवारी पार पडली. या गणनेत पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजेच जून महिन्यात १०३ जातींचे ३९३४ पक्षी आढळून आले.
ठाणे : पर्यावरण दक्षता मंडळ व होप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणे पक्षिगणनेची सोळावी फेरी रविवारी पार पडली. या गणनेत पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजेच जून महिन्यात १०३ जातींचे ३९३४ पक्षी आढळून आले. या गणनेचे वैशिष्ट्य म्हणजे येऊरमध्ये काळा गरुड हा दुर्मीळ पक्षी दिसून आला. तसेच, पाच पावसाळी पाहुण्यांचीही नोंदही झाली.
या दोन्ही संस्थांच्या वतीने दर तीन ते चार महिन्यांनी पक्षिगणना केली जाते. पंधरावी गणना मार्च महिन्यात पार पडली. यंदाच्या सोळाव्या गणनेत ४७ पक्षिनिरीक्षक व पक्षिप्रेमींनी भाग घेतला होता. नेहमीप्रमाणे ठाणे शहराच्या आठ विविध भागांत सकाळी गणना करण्यात आली. २०१३ पासून चालू झालेल्या या गणनेत आतापर्यंत एकूण २३९ जातींच्या पक्ष्यांची नोंद झाली. ओरिएण्टेल ड्वार्फ किंगफिशर (तिबोटी खंड्या), पाइड ककू (चातक), ग्रे बेलीड ककू (कारुण्य कोकिळा), इंडियन ककू (कोकीळ), कॉमन हॉक ककू (पावशा) हे पावसाळी पाहुणे प्रजननासाठी शहरात आल्याचे पक्षिनिरीक्षकांना आढळून आले. मार्चमध्ये पंधरावी गणना पार पडली. त्यावेळी १३५ जातींचे ३७३२ पक्षी आढळून आले होते. या गणनेत ५९ पक्षिप्रेमी-पक्षिनिरीक्षकांनी भाग घेतला. या गणनेचे वैशिष्ट्य म्हणजे येऊरमध्ये दोन टीम पाठवण्यात आल्या असल्याचे आयोजक रवींद्र साठये यांनी सांगितले. या गणनेत पडले-खिडकाळी भागांत सर्वाधिक म्हणजेच ७७ जातींचे पक्षी आढळून आले होते. मार्चमध्ये काही पक्षी स्थलांतरित व्हायचे होते, त्यामुळे यंदाच्या गणनेच्या तुलनेत मार्च महिन्यातील गणनेत अधिक जातींचे पक्षी आढळून आले होते, असे साठये यांनी सांगितले. डिसेंबर महिन्यात चौदावी पक्षिगणना पार पडली होती. यावेळी हिवाळ्याच्या दिवसांत ठाण्यात १२४ जातींचे ३९५२ पक्षी आढळून आले होते, तर या गणनेत प्रथमच ‘फॉरेस्ट वॅगटेल’ व ‘लोटेन्स सनबर्ड’ या दोन जातींची नोंद झाली होती.