ठाण्यात आढळले १२४ जातींचे ३९५२ पक्षी, प्रथमच आढळले ‘फॉरेस्ट वॅगटेल’ व ‘लोटेन्स सनबर्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 02:57 AM2017-12-13T02:57:01+5:302017-12-13T02:57:09+5:30
पर्यावरण दक्षता मंडळ व होप यांनी आयोजित केलेली ठाणे पक्षी गणनेची १४ वी फेरी रविवारी पार पडली. त्यात हिवाळ््यात १२४ जातींचे ३९५२ पक्षी ठाण्यात आढळून आले. प्रथमच ‘फॉरेस्ट वॅगटेल’ व ‘लोटेन्स सनबर्ड’ या दोन जातींची नोंद झाली.
ठाणे : पर्यावरण दक्षता मंडळ व होप यांनी आयोजित केलेली ठाणे पक्षी गणनेची १४ वी फेरी रविवारी पार पडली. त्यात हिवाळ््यात १२४ जातींचे ३९५२ पक्षी ठाण्यात आढळून आले. प्रथमच ‘फॉरेस्ट वॅगटेल’ व ‘लोटेन्स सनबर्ड’ या दोन जातींची नोंद झाली.
या दोन्ही संस्थांच्यावतीने दर तीन ते चार महिन्यांनी ठाणे पक्षी गणना केली जाते. यंदाच्या १४ व्या गणनेत ५१ पक्षीनिरीक्षक व पक्षीप्रेमींनी भाग घेतला होता. नेहमी प्रमाणे ठाणे शहराच्या आठ विविध भागांत सकाळी तीन तास गणना करण्यात आली. या गणनेत १२४ जातींचे ३९५२ पक्षी आढळून आले. यावेळी आजपर्यंत नोंद न झालेल्या ‘फॉरेस्ट वॅगटेल’ व ‘लोटेन्स सनबर्ड’ या दोन जातींची नोंद पडले. खिडकाळी या विभागात झाली. या दोन जाती धरून २०१३ पासून चालू झालेल्या या गणनेत एकूण २३० जातींच्या पक्षांची नोंद करण्यात आली आहे. या गणनेत ठाणे पूर्व भागात एक चातक पक्षी (पाईड कक्कू) आढळून आला. तो जून मध्ये आपल्याकडे आफ्रिका खंडातून स्थलांतर करून येतो व अॉक्टोबरमधे आफ्रिकेत परत जातो. हे पिल्लू लहान किंवा ऊशीरा जन्मल्याने पालकांबरोबर स्थलांतर करू शकले नसावे असा अंदाज पक्षीनिरीक्षकांनी व्यक्त केला. हा काळ पक्षी स्थलात्ांराचा असल्याने या काळात अधिक पक्षी दिसून येतात. स्थलांतराच्या काळात ते खाडी किनारी जास्त आढळतात. या गणनेत हिवाळी पक्षी जास्त आढळून आले. हीच पक्षी गणना मार्चमध्ये घेतली तर आताच्या पक्षी गणनेच्या तुलनेत १० ते १५ प्रजातींचा फरक दिसून येतो अशी माहिती आयोजक रविंद्र साठ्ये यांनी दिली. पुढील १५ वी ठाणे पक्षी गणना ११ मार्च २०१८ रोजी होईल, असे त्यांनी सांगितले.
- १४ व्या पक्षी गणनेत पडले-खिडकाळी भागात सर्वात जास्त म्हणजेच ७२ जातींचे पक्षी दिसले. हा भाग फॉरेस्ट आणि खाडीलगत असल्याने तसेच, या ठिकाणी माणसाचा अधिवास कमी आहे. त्यामुळे, पक्ष्यांना मोकळीक मिळते. म्हणूनच या भागांत जास्त पक्षी आढळून आले असल्याचे साठ्ये यांनी सांगितले. या आधी १३ अॉगस्ट रोजी घेतलेल्या १३ व्या गणनेत ठाणे पूर्व भागात सर्वात जास्त म्हणजेच ४१ जातींचे पक्षी दिसले होते.
- ठाणे पूर्व खाडीचा भाग, कोलशेत रोड, मुंब्रा हिल्स आणि खाडी, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील आजूबाजूचा परिसर, ठाणे पश्चिम खाडीचा भाग, संजय गांधी नॅशनल पार्क, मानपाडा, येऊर, पडले खिडकाळी या आठ भागांत पक्षीनिरीक्षकांना विभागून दिले जाते.