ठाणे जिल्ह्यात एकाच दिवशी आढळले 398 कोरोना पॉझिटीव्ह ; एकूण ५०६८
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 09:41 PM2020-05-22T21:41:38+5:302020-05-22T21:42:53+5:30
आणखी चौघांचा मृत्यू , ठामपामध्ये एकाच दिवशी निदान झाले 197 रुग्ण
ठाणे : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. नवीन सापडलेल्या 398 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे जिल्ह्याच्या आकडा 5 हजार 068 वर पोहोचला आहे. तर एकट्या ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक 197 रुग्ण मिळून आले आहेत. तर भिवंडीत शुक्रवारी एकही नविन रुग्ण आढळून आलेली नाही. तर जिल्ह्याने पाच हजारांचा टप्पा पार केला असून केडीएमसीतील एकूण रुग्ण संख्या 700 वर येऊन थांबली आहे. त्याचबरोबर ठामपात दोघांचा तर केडीएमसी आणि बदलापूर येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
आतापर्यंत जिल्ह्यातील ठामपामध्ये सर्वाधिक 197 रुग्ण एकाच ठिकाणी निदान झालेले आहेत. त्यामुळे तेथील एकूण रुग्ण संख्या एक हजार 757 इतकी झाली आहे. तसेच ठामपा कार्यक्षेत्रात दोघांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 63 झाली. त्याच्या पाठोपाठ नवीमुंबईत 63 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या 1 हजार 485 वर गेली आहे. तर कल्याण डोंबिवलीत 58 नवीन रुग्ण मिळून आल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या 700 झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 18 इतकी झाली आहे. मिराभाईंदर येथे 51 रुग्ण सापडले असून त्या ठिकाणच्या रुग्णांची संख्या 454 वर पोहोचली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये 11 रुग्ण मिळून आल्याने एकूण रुग्ण संख्या 243 झाली आहे. 10 रुग्ण बदलापूर येथे सापडले असून तेथील रुग्ण ही 147 झाली आहे. तसेच तेथे एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 4 झाली आहे. अंबरनाथ येथे 6 रुग्ण आढळून आले असून तेथील रुग्णांची संख्या 54 झाली आहे. 2 रुग्ण हे उल्हासनगरमध्ये निदान झाल्याने एकूण रुग्ण संख्या 156 वर गेली आहे. पण भिवंडीत एक ही रुग्ण न सापडल्याने एकूण रुग्ण संख्या 82 वर स्थिर राहिल्याची रुग्णालय प्रशासनाने दिली.