३९८ सदनिका नागरी समूहाच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2016 01:59 AM2016-01-18T01:59:19+5:302016-01-18T01:59:19+5:30
शासकीय निवासस्थानांच्या प्रतीक्षेत असलेल्या शासकीय-अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता जवळजवळ संपली आहे. शासनदेय क्षेत्र म्हणून नागरी
ठाणे : शासकीय निवासस्थानांच्या प्रतीक्षेत असलेल्या शासकीय-अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता जवळजवळ संपली आहे. शासनदेय क्षेत्र म्हणून नागरी
समूहाकडे ताब्यात आलेल्या ५० टक्के सदनिका शासकीय निवासस्थाने म्हणून लवकरच वाटप करण्यात येणार आहेत.
सद्य:स्थितीत ठाणे शहर, मीरा-भार्इंदर येथे २४० व कल्याण, अंबरनाथ येथे १५८ अशा एकूण ३९८ सदनिका उपलब्ध झाल्या आहेत. याबाबत, जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी आढावा घेऊन एक समिती गठीत करून या सदनिकांमध्ये वीज, पाणी अथवा अन्य सुविधांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
नागरी समूहांच्या ताब्यात असलेल्या सदनिकांपैकी ५० % सदनिका शासकीय निवासस्थाने म्हणून वाटप करावयाच्या प्रस्तावास यापूर्वीच शासनाने मान्यता दिलेली आहे. ज्या शासनदेय सदनिका अद्यापही त्यांच्या नागरी समूहाकडे प्राप्त झालेल्या नाहीत, अशा सदनिका संबंधित विकासकाकडून तत्काळ प्राप्त करून घेऊन त्या सदनिकांची यादी संबंधितांकडे सुपूर्द करून कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)