चार महिन्यांत ३२ बालकांचा कुपोषणाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:49 PM2019-08-25T23:49:43+5:302019-08-25T23:50:43+5:30
शासकीय यंत्रणेकडून मात्र आजारांचे कारण : ९७७ कुपोषित बालकेही आढळली
सुरेश लोखंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत ० ते ६ वर्षांपर्यंतच्या ३२ बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. मात्र, शासकीय यंत्रणांनी नेहमीप्रमाणे विविध आजारांच्या चक्र व्यूहात अडकल्याने या बालकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. शिवाय ९७७ कुपोषित बालकांसह तीव्र कमी वजनाची व कमी वजनाची ९९०७ बालके आढळली आहेत.
देशभरात श्रीकृष्णजन्माचा आनंदोत्सव साजरा होत असतानाच या मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या परिवारात मात्र दु:ख व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील मृत्युमुखी पडलेल्या बालकांचा शोध घेतला असता तब्बल ३२ बालके आदिवासी, दुर्गम, गावपाड्यांत दगावल्याचे निदर्शनात आले. गेल्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये १११ बालकांचा तर २०१७ मध्ये ११६ बालकांचा आणि २०१६ या वर्षांत तब्बल १४० बालके दगावली आहेत. या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण अत्यल्प असून अवघी ३२ बालके चार महिन्यांच्या कालावधीत दगावल्याचे येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेघे यांनी सांगितले. गावपाड्यांमध्ये विविध उपाययोजना सातत्याने राबवत असल्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे शक्य झाल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.
जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण हे दोन तालुके वगळता एप्रिल ते जुलैअखेर शहापूर तालुक्यात सर्वाधिक १७ बालकांचा मृत्यू झाला आहे. मुरबाडला आठ आणि भिवंडी तालुक्यात सात बालके दगावली आहेत. या ० ते ६ वयोगटांतील ३२ बालकांमध्ये कमी वजनाच्या दोन बालकांचा तर कमी दिवसाच्या तीन बालकांचादेखील समावेश आहे. याशिवाय जन्मत: व्यंग, हायपो थर्मिया आणि जन्मता कावीळ या आजारांचे प्रत्येक एक बालक दगावले आहे. तर, न्यूमोनियामुळे तीन आणि अॅस्पेक्शियाच्या सात बालकांचा मृत्यू झाला आहे. इतरमध्ये सर्वाधिक आठ बालके दगावल्याची नोंद आहे. तर सेप्टीसिमिया, अतिज्वर, अपघात, ड्रावनिंग, सर्पदंश आणि न्यूमोनिया यांच्यामुळे प्रत्येकी एक बालकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
यंदाच्या या बालमृत्यूप्रमाणेच २०१६ ला १४० बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यानंतर हे प्रमाण कमी होऊन २०१७-१८ ला ११६ बालकांचे दगावली. यामध्ये ० ते १ या वयोगटातील ९६ तर १ ते ५ वर्षांच्या २० बालकांचा दारी-अंगणी रांगण्याच्या, खेळण्याच्या कालावधीत मृत्यू झाला. २०१८-१९ मध्ये १ ते ५ वयोगटामधील १५ बालकांचा मृत्यू झाला असून ० ते १ वर्षाच्या ९६ बालके या कालावधीत दगावले आहेत. या तुलनेत यंदा एप्रिल ते जुलै या कालावधीत अवघी ३२ बालके दगावली आहेत. बालमृत्यूचे हे प्रमाण कमी करण्यासाठी आदिवासी, ग्रामीण व दुर्गम भागात विविध उपाययोजना व औषधोपचार सातत्याने केला जात असल्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे डॉ. रेघे यांच्याकडून सांगितले जात आहे.