पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत चार कोटी ६५ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:39 AM2021-04-06T04:39:27+5:302021-04-06T04:39:27+5:30
कल्याण : पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे, पाली, बुर्दुल, नाऱ्हेण, शेलारपाडा ते इजिमा या रस्त्यांच्या कामांसाठी चार कोटी ...
कल्याण : पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे, पाली, बुर्दुल, नाऱ्हेण, शेलारपाडा ते इजिमा या रस्त्यांच्या कामांसाठी चार कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीसाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता.
केंद्र सरकारकडून २००० पासून पंतप्रधान ग्रामसडक योजना राबविली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करण्यात येते. पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा मुख्य उद्देश हा सर्वसाधारण व बिगर आदिवासी भागातील एक हजारपेक्षा जास्त आणि आदिवासी भागातील ५०० पेक्षा जास्त लोकवस्तीची न जोडलेली गावे बारमाही रस्त्याद्वारे जोडणे हा आहे. सध्या या योजनेद्वारे बिगर आदिवासी भागातील ५०० पेक्षा जास्त व आदिवासी भागांतील २५० पेक्षा जास्त लोकवस्तीची न जोडलेली गावे बारमाही रस्त्याद्वारे जोडण्याच्या प्रस्तावास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे, बुर्दुल, नाऱ्हेण, पाली, चिरड, शेलारपाडा ते इजिमा हा रस्ता नागरिकांसाठी गरजेचा आहे. सध्या हा रस्ता अत्यंत खराब असल्याने दळणवळणासाठी गैरसोयीचा आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात होती. डॉ. शिंदे यांनी त्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजना व महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांची मागणी मंजूर झाली आहे. जवळपास सात किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचे काम मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
-----------------