मजुरांसाठी २६० कोटींची नरेगाची कामे, जि.प.चा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 01:33 AM2020-03-16T01:33:10+5:302020-03-16T01:33:27+5:30
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एमजी नरेगाची ५१ हजार ४९५ कामे हाती घेतली आहेत. यातील ४८ हजार ९४ कामे ग्रामपंचायतींच्या नियंत्रणात केली जाणार आहेत.
- सुरेश लोखंडे
ठाणे : गावपाडे, खेड्यांमधील मजुरांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात २६० कोटी ८८ लाख रुपये खर्चाच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा परिषदेतर्फे महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी (एमजी नरेगा) योजनेद्वारे ही कामे हाती घेतली जाणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एमजी नरेगाची ५१ हजार ४९५ कामे हाती घेतली आहेत. यातील ४८ हजार ९४ कामे ग्रामपंचायतींच्या नियंत्रणात केली जाणार आहेत. यामध्ये १३२ कोटी सहा लाख रुपये खर्चाची अकुशल मजुरांची कामे आहेत. कुशल कामगारांसाठी ८० कोटी ६४ लाखांची कामे हाती घेतली आहे. यामुळे ग्रामपंचायतींच्या माध्यमातून तब्बल २१२ कोटी ७० लाखांची कामे केली जाणार आहेत.
नरेगाच्या कामांपैकी अंबरनाथ तालुक्यात १० कोटी ७२ लाखांची दोन हजार ५५ कामे केली जातील. भिवंडी तालुक्यात आठ हजार २२५ कामे असून, त्यावर २३ कोटी ७७२ लाखांचा खर्च होईल. कल्याण तालुक्यात नऊ कोटी २३ लाखांचे, तर मुरबाड तालुक्यात १५८ कोटी १९ लाख खर्च करण्याचे नियोजन आहे. शहापूर तालुक्यामध्ये सात हजार ३९३ कामे हाती घेतली आहेत. त्यांच्यावर ५९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.