ठाणे जिल्ह्यातील आपत्ती निवारण, उपाययाेजनांसाठी चार काेटी
By सुरेश लोखंडे | Published: April 25, 2023 07:27 PM2023-04-25T19:27:58+5:302023-04-25T19:28:06+5:30
आराखडा तयार करून कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना
ठाणे : मान्सूनमध्ये जिल्ह्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती येऊ नये. आपत्ती आली तरी त्याचे परिणाम तीव्र होऊ नयेत, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक यंत्रणांनी काळजी घ्यावी. आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून कामे ३१ मे पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज घेतलेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना दिल्या. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा नियाेजन समितीने चार काेटींची तरतूद केल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी स्पष्ट केले.
महापालिकांसह, जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन आदी संबंधित यंत्रणांचा आपत्ती नियंत्रण व उपाययाेजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मान्सून पूर्व तयारी व आपत्ती निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांचे सादरीकरण करत तहसीलदार राजाराम तवटे यांनी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांच्यासह जिल्ह्यातील महापालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, एनडीआरएफ, पोलिस, गृहरक्षक दल यांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात ५०० आपदा मित्रांना प्रशिक्षण
आपत्ती सौम्यीकरणासाठी जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. या निधीतून आपत्ती निवारण व इतर कामांसाठी साहित्य खरेदी करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे चार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यातूनही आवश्यक ते साहित्य घेण्यात येणार आहे. आपत्ती काळात जलद प्रतिसादासाठी जिल्ह्यात ५०० आपदा मित्रांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. कोणत्याही आपत्ती काळात हे आपदा मित्र मदतीसाठी तयार आहेत, असेही सुदाम परदेशी यांनी स्पष्ट केले.