ठाण्यात १६ फेब्रुवारीपासून ४ दिवसांचा "शिवजन्मोत्स सोहळा"
By प्रज्ञा म्हात्रे | Published: February 15, 2024 02:56 PM2024-02-15T14:56:18+5:302024-02-15T14:56:43+5:30
मुख्यमंत्री शिंदे, जरांगे, पाटील यांना मराठा भूषण पुरस्कार जाहीर
ठाणे : छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात "शिवजन्मोत्सव सोहळा" आयोजित करण्यात आला आहे. १६ फेब्रुवारीपासून सलग चार दिवसांच्या या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे आणि नरेंद्र पाटील यांचा मराठा भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश आंब्रे मंगेश आवळे,संतोष सूर्यराव,चंद्रशेखर पवार,रक्षा यादव,चौधरी,युवराज सूर्यवंशी,गणेश पवार,धनंजय समुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळ ठाणे, आयोजित शिवजयंती निमित्त यंदा १६ ते १९ फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेच्या दरम्यान हा शिवजन्मोत्सव सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे यंदाचे ७ वे वर्ष असून या सोहळ्यात विविध सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता महाराष्ट्राची खाद्य संस्कृती अर्थात चव महाराष्ट्राची; सायं. ५ वाजता हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न होणार आहे.
१७ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वा. चित्रकला स्पर्धा, ६ वाजता वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १८ फेब्रुवारी रोजी ५ वा. शिवपोवाडा तर शिव जयंतीच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून रात्री १० वाजता शिवस्मारक येथे दीपोत्सव संपन्न होणार आहे. दरम्यान, १९ फेब्रुवारी ४:३० वा. तलावपाळी परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी ७:३० वा. सामाजिक क्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज जरांगे-पाटील,नरेंद्र पाटील यांना मराठा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे रमेश आंब्रे यांनी सांगितले.