चक्रीवादळात मरण पावलेल्या वृद्धेच्या कुटुंबास ४ लाख; राज्य सरकारने केली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 06:22 PM2021-06-04T18:22:01+5:302021-06-04T18:22:28+5:30
मीरारोड - तौक्ते चक्रीवादळा मुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड ह्या ७५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू ...
मीरारोड - तौक्ते चक्रीवादळा मुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड ह्या ७५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला होता . राज्य शासनाकडून गायकवाड यांच्या वारसांना ४ लाख रुपयांचा धनादेश देऊन अर्थसहाय्य करण्यात आले .
१७ मे रोजी सायंकाळी काशीमीराच्या मीनाक्षी नगर भागात एका झोपडीवर तौक्ते चक्रीवादळामुळे झाड कोसळले. झाड कोसळल्याने झोपडीत असलेल्या लक्ष्मी गायकवाड ह्या वृद्धेचा मृत्यू झाला. महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन झोपडी वरील झाड बाजूला काढले . काशीमीरा पोलिसांनी दुर्घटनेची नोंद केली.
या प्रकरणी तलाठी अभिजित बोडके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत त्याचा अहवाल अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख याना सादर केला होता . नैसर्गिक आपत्ती मध्ये मृत्यू झाल्यास शासना कडून ४ लाख रुपयांचे अर्थ सहाय्य वारसांना केले जाते . त्या अनुषंगाने शासनाच्या मंजुरी नंतर ४ लाखांचा धनादेश हा देशमुख यांच्या हस्ते गायकवाड यांच्या मुलांना देण्यात आला.