मांजामुळे १२ कबुतरांचा गेला बळी; चायनीज, नायलॉन मांजावर कारवाई नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 12:47 AM2020-01-17T00:47:10+5:302020-01-17T00:47:26+5:30
मीरा-भाईंदरमधील चित्र : विविध सामाजिक संस्थांच्या केंद्रांत ९० जखमींना आणले
मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त मंगळवारी व बुधवारी पतंगांच्या मांजामुळे ९० कबुतरे जखमी झाली. त्यातील १२ कबुतरांना जीव गमवावा लागला. मागील काही वर्षांच्या तुलनेत ही संख्या कमी होत चालली आहे. परंतु, चायनीज वा नायलॉन मांजावर कारवाई झाली नसल्याची खंतही संस्थांनी बोलून दाखवली आहे.
भार्इंदर पश्चिमेच्या जैन अॅलर्ट ग्रुपने १२ वर्षांपूर्वी जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यासह पतंगांच्या मांजांमुळे होणाऱ्या जीवघेण्या प्रकारांविरोधात जनजागृती सुरू केली. विविध माध्यमांतून या ग्रुपने जनजागृती करत पतंग न उडवण्याची शपथ देण्यास लावली. याशिवाय अहिंसा चॅरिटेबल ट्रस्ट, स्टेनलेस स्टील असोसिएशन, जीवदया फाउंडेशन, समकीत ग्रुप आदींनीही शहरात यासाठी जनजागृती व जखमी पक्ष्यांवर उपचार करत आहेत. यंदाही मकरसंक्रांतीच्या आधी या संस्थांनी पतंग उडवल्याने मांजामुळे होणाºया परिणामांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.
मंगळवार व बुधवार अशा दोन दिवसांत मांजामुळे जखमी झालेली ९० कबुतरे विविध केंद्रांत उपचारासाठी आणली होती. त्यातील १२ कबुतरांचा मृत्यू झाला. यात भार्इंदर पश्चिमेच्या अहिंसा चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयात २२ जखमी कबुतरे आली होती व त्यातील तिघांचा मृत्यू झाला. जैन अॅलर्ट ग्रुपच्या केंद्रात आलेल्या जखमी ३७ कबुतरांपैकी चौघांचा मृत्यू झाला. भार्इंदर पूर्वेला स्टेनलेस स्टील असोसिएशन व जीवदया फाउंडेशन यांनी उभारलेल्या केंद्रात ११ जखमी कबुतरांना उपचारासाठी आणले असता त्यातील एकाचा मृत्यू झाला. मीरा रोडच्या समकीत ग्रुपच्या केंद्रात जखमी १८ कबुतरांपैकी तिघांचा मृत्यू झाला. जीवदया परिवार केंद्रात बुधवारी आलेल्या दोन जखमी कबुतरांपैकी एकाचा मृत्यू झाला.
गेल्या काही वर्षांत पतंगबाजीमुळे जखमी व मृत्युमुखी पडणाºया कबुतरांच्या संख्येत घट होत असून त्याला विविध संस्थांनी गेल्या काही वर्षांत चालवलेल्या जनजागृतीचे प्रमुख कारण आहेच. पण, त्याचसोबत वाढती महागाई व आजकाल मुले, तरुण मोबाइलमध्ये गुंतल्याने पतंग उडवण्याचे प्रमाण घटले असल्याचे अहिंसा ट्रस्टचे कौशल शाह यांनी सांगितले. पतंगबाजीदरम्यान कापलेली पतंग व मांजा झाडांच्या फांद्यांमध्ये अडकून राहतो. त्यामुळे झाडांवरील मांजा पक्ष्यांना घातक आहे. त्यात अडकून पक्षी जखमी वा मरण पावतात. त्यामुळे पालिकेने शहरातील झाडांवर अडकलेला मांजा काढून घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
चायनीज, नायलॉन मांजावर कारवाई नाही
पतंग उडवण्यासाठी बंदी असलेल्या चायनीज वा नायलॉन मांजावर पोलिसांनी कारवाई केली. परंतु, मीरा-भार्इंदरमध्ये मात्र अशी कारवाई झाली नाही. वास्तविक, महिनाभर आधीपासून बंदी असलेल्या अशा घातक मांजावर कारवाई झाली असती, तर जखमी व मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांच्या संख्येत आणखी घट झाली असती. यामुळे कारवाई व्हायला हवी होती, अशी खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.