कल्याण तालुक्यातील ३५ गावांचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:29 AM2019-07-28T00:29:08+5:302019-07-28T00:29:25+5:30
उल्हास नदीवरील रायते पुलावरून शुक्र वारी रात्री पाणी वाहू लागल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने महामार्ग बंद केला.
म्हारळ : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला पावसाने शुक्रवार रात्रीपासून झोडपून काढले. तालुक्यातील ३५ गावांचा संपर्क तुटला. सखल भाग असलेल्या म्हारळ परिसरात पाणी साचल्याने तेथील नागरिकांची शनिवारी दुपारनंतर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचे (एनडीआरएफ) एक पथक आणि लष्कराच्या दोन पथकांनी बोटींद्वारे सुटका करत त्यांना सुरक्षितस्थळी हलवले. तर, रायता येथील उल्हास नदीजवळील केडिया फार्ममधील जवळपास २१ गायी-वासरे पुरात वाहून गेल्याचे समजते.
म्हारळ येथील बोडके चाळ, राधाकृष्ण नगरी, अनसूयानगर, गणेशनगर आणि रिजन्सी संकुल परिसर पाण्यात बुडाला. त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरले. वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महामार्गावरही पाच ते दहा फूट पाणी साचले. त्यामुळे कल्याण-मुरबाड-नगरदरम्यानची वाहतूक ठप्प झाली.
उल्हास नदीवरील रायते पुलावरून शुक्र वारी रात्री पाणी वाहू लागल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने महामार्ग बंद केला. कल्याणला येणारे सर्वच मार्ग बंद झाल्याने शेकडो वाहने महामार्गावर अडकून पडली. कांबा परिसरात महापालिकेचे आपत्कालीन पथक, अग्निशमन दल आणि बोटींद्वारे मोर्यानगरातील बुडालेल्या चाळीतील ४५ रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
आणे गाव उल्हास नदीकाठी असल्याने ते पूर्णपणे पाण्याखाली गेले. तेथील ५५० ग्रामस्थांनी १५० जनावरांसह लगतच्या टेकडीवर आश्रय घेतला. मात्र, प्रशासनाकडून मदत मिळाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रायते गावातही नदीचे पाणी शिरल्याने ग्रामस्थ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले. तेथे घराघरांमध्ये पाणी शिरल्याने सामानाचे प्रचंड नुकसान झाले.
शहाड परिसरात मोहना रोड पाण्याखाली गेल्याने शहाड पुलावर वाहने अडकून पडली. बंदरपाडा परिसर जलमय झाल्याने तेथील नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. मोहना रोड येथील मुथा संकुलाच्या मागील बाजूस नाल्याशेजारी असलेल्या सद्गुरूनगर चाळीतील सर्व रहिवाशांना पाटीदार भवन येथे स्थलांतरित करण्यात आले. आ. नरेंद्र पवार यांनी बोटीने पुराची पाहणी करून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
नागरिकांनी व्यक्त केला रोष
कल्याण ग्रामीण भागातील वरप, कांबा आणि म्हारळ येथे नेते मंडळींनी सायंकाळी भेट दिली. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी नेत्यांना आता उशिरा जाग आली का, असा सवाल करत रोष व्यक्त केला. सगळे झाल्यावर नेते येतात. ही काय येण्याची वेळ आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याच्या प्रवाहातून बोटीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी केडीएमसीच्या अग्निशमन विभागाने अधिक मेहनत घेतल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, रायते, वाहोली, मांजर्ली, आपटी, रोहन, चौरे, पोई, दहागाव, बापसाई, मामनोली केळणी, अनखरपाडा, अनखर, कुंदे आदी ३५ गावांचा संपर्क तुटला आहे.