मुंब्र्यातून PFI च्या ४ कार्यकर्त्यांना अटक, महाराष्ट्रातही छापेमारी सुरूच
By जितेंद्र कालेकर | Published: September 27, 2022 11:32 AM2022-09-27T11:32:24+5:302022-09-27T11:33:08+5:30
महाराष्ट्रातील सोलापूर, मालेगाव आणि मुंबईतील मुंब्र्यातून काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
ठाणे : सध्या संपूर्ण देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)विरोधात मोठी कारवाई सुरू आहे. यातच मंगळवारी सकाळच्या सुमारास तब्बल 7 राज्यांमध्ये पोलिसांनी छापे टाकले. माध्यमांतील वृत्तांनुसार, या दरम्यान जवळपास 170 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 13 राज्यांत छापे टाकत 100 हून अधिक पीएफआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. महाराष्ट्रातील सोलापूर, मालेगाव आणि मुंबईतील मुंब्र्यातून काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
मुंब्र्यातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या चार कार्यकर्त्यांना ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-1, खंडणी विरोधी पथक, मालमत्ता विरोधी पथक, युनिट-5 आणि झोन-1च्या पथकाने पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी पहाटेच्या सुमारास राबविलेल्या संयुक्त कारवाईत अटक केली आहे. मुंब्रा येथील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) वरील कारवाईत समाज विघातक कृत्य करणाऱ्या आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्याच्याविरुद्ध ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, सध्या पोलीस उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, आसाम, कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात तपास करत आहेत. हिंसक निदर्शनांच्या नियोजनासंदर्भात इनपुट मिळाल्यानंतर छापे टाकण्यात आले. वरिष्ठ गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 6 वाजेपर्यंत 7 राज्यांत 200 ठिकाणांवर छापे टाकून 170 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.