४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 09:50 PM2017-12-13T21:50:20+5:302017-12-13T21:50:48+5:30
मीरा रोड - शेजारची लहान मुलं दाराजवळ घाण करतात म्हणून एका ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण करत कच-याच्या ढिगा-यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना भार्इंदरमध्ये घडली आहे.
मीरा रोड - शेजारची लहान मुलं दाराजवळ घाण करतात म्हणून एका ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण करत कच-याच्या ढिगा-यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना भार्इंदरमध्ये घडली आहे. नवघर पोलिसांनी तिच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी शेजारी राहणा-या १९ वर्षीय तरुणास अटक केली आहे.
आझाद नगर परिसरात महापालिकेच्या मालकीचा आरक्षित भूखंड असून त्या ठिकाणी बेकायदा झोपड्या, बांधकामे, कच-याची गोदामे आदी अतिक्रमण झालेले आहे. सदर ठिकाणी कच्च्या झोपडीत इसरार शेख हे पत्नी व प्रत्येकी दोन मुलगे व दोन मुलींसह राहतात. शेजारीच असलेल्या कच्च्या झोपड्यात काही कचरा-भंगार गोळा करणारे एकत्र मिळून राहतात. इसरार यांची मुलं लहान असल्याने ते लघुशंका आदी शेजारच्या झोपड्यांजवळ करत असल्याने त्यावरून रहिम शौकत अली शेख (१९) ह्याचे इसरार यांच्याशी भांडण होत असे. रहिम हा लहान मुलांना देखील दमदाटी, शिवीगाळ करत असे.
मंगळवारी रात्री ९च्या सुमारास इसरार यांची ४ वर्षांची मुलगी आफरीन ही दिसत नसल्याने घरच्यांसह परिसरातील रहिवाशांनी तिच्या शोधासाठी धापवळ सुरू केली. आफरीन बेपत्ता असल्याचे नवघर पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंह रह उपनिरीक्षक विजय टक्के, गिरीश भालचीम व अन्य पोलीस कर्मचा-यांनी देखील शोधाशोध सुरू केली.
रात्रीच्या वेळेत पोलीस व रहिवाशांनी आझादनगर परिसरा सह उड्डाणपुलाखाली, इंद्रलोक झोपडपट्टी आदी सर्व परिसर पिंजून काढला. पण आफरीनचा कुठे शोध लागला नाही. दुसरी कडे संशयित रहिमसुद्धा बेपत्ता झाला होता. आझाद नगर मस्जिद मागील कच-याच्या ढिगा-यातून विव्हळण्याचा आवाज तेथील एका रहिवाशाला आल्यानंतर पोलीस व अन्य लोकांनी धाव घेत पाहणी केली असता आफरीन ही जखमी व रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली आढळून आली. तिला नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, तिच्या डोक्यावर, चेह-यावर जखम झालेली आहे. डोक्याला ५ ठिकाणी जखमा झाल्या आहेत. पोलीस व रहिवाशी हे रहिमचा शोध घेत असताना अनिस खान ऊर्फ मुन्ना, सलीम मनिहार आदींना रहिम हा क्रीडा संकुलामागील भागात लपलेला दिसून आला. लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
आफरीन रात्री लघुशंकेसाठी गेली असता रहिमने तिला हटकले व रागाच्या भरात डोक्यावर रॉडने मारले. नंतर तिला कच-यात टाकून दिल्याची कबुली त्याने पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हत्या व गुन्ह्यांना महापालिका जबाबदार ?
आझाद नगर व मागील परिसर हा खेळाचे मैदान, सामाजिक वनीकरण आदी पालिका आरक्षणाखाली राखीव असून, मोठ्या प्रमाणात पालिकेने टिडीआर देऊन जागा मिळवली आहे. परंतु या ठिकाणी झोपड्या, बांधकामे, भंगार व कचरयाची गोदामे आदींचे सर्रास अतिक्रमण झालेले असताना देखील पालिका मात्र केवळ बघ्याची भुमिका घेत या अतिक्रमणांना पाठीशी घालत आहे. या आधी एका ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तीची हत्या करुन मृतदेह याच भागात टाकण्यात आला होता. पवई येथुन अपहरण करुन आणलेल्या १० वर्षाच्या मुलास देखील येथे मारुन टाकण्यात आले होते. तरी देखील पालिकेने या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात केले नसुन भुखंड देखील कुंपण घालुन ताब्यात घेतलेला नाही. पालिकेच्या डोळेझाक पणा मुळे येथे गंभीर स्वरुपाचे गुन्हे मात्र सतत घडत असल्याने लोकां मध्ये संताप व्यक्त होत आहे.