काँग्रेसकडून ४०-६० चा फॉर्म्युला
By Admin | Published: February 1, 2017 03:28 AM2017-02-01T03:28:03+5:302017-02-01T03:28:03+5:30
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला ४० टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेसला ६० टक्के जागा सोडण्याबाबतचा प्रस्ताव उभय पक्षांतर्फे प्रदेश पातळीवर धाडण्यात आला असून
- पंकज पाटील, उल्हासनगर
उल्हासनगर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला ४० टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेसला ६० टक्के जागा सोडण्याबाबतचा प्रस्ताव उभय पक्षांतर्फे प्रदेश पातळीवर धाडण्यात आला असून आता यावर राज्यातील नेते चर्चा करणार आहेत.
राष्ट्रवादीने आपल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. टीम ओमीच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना कल्पना दिली आहे. आतापर्यंत स्वबळाची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीला वरिष्ठांकडून आदेश मिळताच काँग्रेससोबत आघाडी करण्यासंदर्भात चाचपणी करण्यात आली. काँग्रेसच्या नेत्यांनी देखील राष्ट्रवादीसोबत आघाडीची चर्चा करावी, असे संकेत दिले आहेत.
टीम ओमी ही राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यावर राष्ट्रवादीची काय अवस्था होणार याची कल्पना त्यांच्या नेत्यांना आली आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठींच्या आदेशांचे पालन करण्याचे जिल्ह्यातील नेत्यांनी ठरवले आहे.
काँग्रेसने एकूण जागांच्या ४० टक्के जागा सोडण्याचा आणि राष्ट्रवादीने ६० टक्के जागांवर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पक्षाचे किती नगरसेवक कलानी यांच्यासोबत जातात हे पाहिल्यावर जागावाटपात फेरबदल होऊ शकतो, असे काँग्रेसचे मत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार असल्याने दोन्ही पक्षांनी आघाडीचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी गेल्या निवडणुकीत आघाडी केलेली होती. या निवडणुकीतही आघाडी व्हावी ही आमची इच्छा आहे. वरिष्ठांनी देखील त्या संदर्भात चाचपणी करण्याच्या सूचना केल्या आहे. त्यानुसार बैठकींचे सत्र सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांत परिणामकारक निर्णय हाती येतील. - जयराम लुल्ला,
उल्हासनगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे उल्हासनगरातील आघाडीच्या चर्चेवर लक्ष ठेऊन आहेत. चर्चेचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येत आहे. आघाडी व्हावी ही नेत्यांनी इच्छा आहे.
- निलेश पेढारी, काँग्रेसचे प्रभारी, उल्हासनगर.
काँग्रेसकडून जागावाटपाचा प्राथमिक प्रस्ताव राष्ट्रवादीकडे आला आहे. विद्यमान नगरसेवकांच्या जागा सोडून उर्वरित जागांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहे.
-प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस