बिहारमधून आणलेल्या ४० अल्पवयीन मुलांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 05:04 AM2018-12-02T05:04:51+5:302018-12-02T05:05:16+5:30
मुंबईत कामानिमित्त बिहारमधून आणलेली ४० अल्पवयीन मुले बालकामगार होण्यापूर्वीच प्रथम मुंबई शिक्षण उपक्रम आणि पालवी चॉईल्ड लाईन या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ठाणे रेल्वे स्थानकातून शनिवारी सकाळी ताब्यात घेतले.
ठाणे : मुंबईत कामानिमित्त बिहारमधून आणलेली ४० अल्पवयीन मुले बालकामगार होण्यापूर्वीच प्रथम मुंबई शिक्षण उपक्रम आणि पालवी चॉईल्ड लाईन या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना ठाणे रेल्वे स्थानकातून शनिवारी सकाळी ताब्यात घेतले. त्यांना मुंबईत आणणारे आरोपी फरार झाले आहेत.
ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात ज्यांचे नातेवाईक किंवा पालक पुढे आले त्या २० जणांना त्यांच्या हवाली केले. तर उर्वरित २० जणांची भिवंडी आणि उल्हासनगर बालसुधारगृहात रवानगी केली असून, या प्रकरणी सध्या कोणताही गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, हा मुले तस्करीचा प्रकार नसल्याचे संस्थेने स्पष्ट केले.
प्रथम संस्थेच्या बिहारमधील शाखेद्वारे कल्पना जाधव व वैशाली जाधव यांना ५६ मुले मुंबईत येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार संस्थेने पालवी चॉईल्ड लाईन संस्थेच्या सहकार्याने शनिवारी बिहार येथून आलेल्या एक्स्प्रेसमधून ठाण्यात उतरलेली ४० मुले ताब्यात घेतली. त्यांना ठाणे-मुंबईत आणणारे सूत्रधार फरार झाले. या मुलांमध्ये सर्वांत जास्त मुले ही १४ वर्षांखालील आहेत. त्या ४० मुलांमध्ये ज्या-ज्या मुलांचे नातेवाईक अथवा पालक ठाणे-मुंबई किंवा आजूबाजूच्या शहरांत राहत आहेत. त्यांची आणि मुलांची लोहमार्ग पोलिसांच्या समक्ष ओळख पटवून त्या मुलांना त्यांच्या स्वाधीन केले. मात्र, २० मुलांचे कोणीही नातेवाईक नसल्याने त्यांची बालसुधारगृहांत रवानगी केल्याची माहिती कल्पना जाधव यांनी दिली.
दोन महिन्यांपूर्वी मुलुंड परिसरातून अशा प्रकारे ३२ अल्पवयीन मुलांची सुटका केली होती. त्या वेळी मुलांना बिहार येथून आणणाºयांविरोधात मुलुंड पोलीसांत गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.