उल्हासनगर महापालिकेत ७८ पैकी ४० मराठी नगरसेवक
By Admin | Published: February 24, 2017 07:03 AM2017-02-24T07:03:52+5:302017-02-24T07:03:52+5:30
महापालिकेच्या ७८ पैकी सर्वाधिक ४० मराठी, तर २८ सिंधी भाषिक नगरसेवक निवडून आले
सदानंद नाईक / उल्हासनगर
महापालिकेच्या ७८ पैकी सर्वाधिक ४० मराठी, तर २८ सिंधी भाषिक नगरसेवक निवडून आले. सिंधी समाजाचा टक्का घसरला असून मुस्लिम समाजाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. पंजाबी ५, उत्तर भारतीय ३, तर एक बंगाली भाषिक नगरसेवक निवडून आला आहे. भाजपासह शिवसेनेने सिंधी भाषिक महापौराची हाक दिली होती. ती कितपत दोन्ही पक्ष पाळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिंधीबहुल शहर म्हणून उल्हासनगरची असणारी ओळख हळूहळू पुसली जात आहे. एकेकाळी फक्त सिंधी भाषिक नगराध्यक्ष असायचा. मराठी नगरसेवक बोटावर मोजण्याइतपत होते. आज परिस्थिती बदलली असून ७८ पैकी तब्बल ४० नगरसेवक मराठी भाषिक निवडून आले आहेत. तर, सिंधीबहुल शहरात सिंधी समाजाचे फक्त २८ नगरसेवक निवडून आले. सिंधीबहुल प्रभागातही मराठी नगरसेवक निवडून आल्याचे उघड झाले असून सिंधी समाज मतदान करण्यासाठी येत नसल्याचे मुख्य कारण पुढे येत आहे.
शिवसेनेचे २५ पैकी २१ नगरसेवक मराठी असून ३ पंजाबी, तर एक उत्तर भारतीय आहे. भाजपा व ओमी टीमच्या ३२ पैकी १७ सिंधी भाषिक, तर ११ मराठी, पंजाबी २, उत्तर भारतीय व बंगाली प्रत्येकी एक नगरसेवक आहे. साई पक्षाचे ११ पैकी ९ सिंधी भाषिक, तर प्रत्येकी एक उत्तर भारतीय व मराठी भाषिक आहेत.
राष्ट्रवादीच्या ४ पैकी २ सिंधी, एक मराठी व एक पंजाबी भाषिक आहे. काँग्रेस, भारिप, रिपाइं, पीआरपी यांचे सर्व नगरसेवक मराठी भाषिक आहेत. सिंधी महापौरावरून निवडणुकीपूर्वी शिवसेना व भाजपाने राजकारण खेळले असून ते खरोखरच सिंधी भाषिक महापौराला प्राध्यान्य देतात का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.