तब्बल ४० हजार घरांची नोंदणी रखडली, १५ कोटींच्या महसुलावर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 02:55 AM2018-04-15T02:55:39+5:302018-04-15T02:55:39+5:30
कोणताही शासन आदेश नसताना गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे ग्रामीण भागातील नवीन घरांची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयाने बंद केली आहे. अंदाजे ४० हजार घरांची नोंदणी रखडली असून शासनालाही सुमारे १५ कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.
ठाणे : कोणताही शासन आदेश नसताना गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे ग्रामीण भागातील नवीन घरांची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयाने बंद केली आहे. अंदाजे ४० हजार घरांची नोंदणी रखडली असून शासनालाही सुमारे १५ कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.
कल्याण - डोंबिवलीच्या ग्रामीण भागासह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी संपूर्ण कागदपत्रे तपासल्याशिवाय घरांची नोंदणी करू नये, असे आदेश सहा महिन्यांपूर्वी जिल्हा निबंधकांनी दुय्यम निबंधकांना दिले होते. मात्र त्याचा चुकीचा अर्थ लावत दुय्यम निबंधक कार्यालयाने पालिका कार्यक्षेत्र वगळता ग्रामीण भागातील सरसकट घरांची दस्त नोंदणीच बंद केली. नव्याने घर विकत घेतलेल्या नागरिकांना या बंदीचा फटका बसला आहे.
जिल्हा निबंधक कार्यालयाने केवळ अंबरनाथ तालुक्यातील अनधिकृत घरांची नोंदणी बंद करावी, असे स्पष्ट आदेश दिले असल्याने सरसकट बंद करण्यात आलेली दस्त नोंदणी तत्काळ सुरू करावी, अन्यथा बेमुदत उपोषण करू, असा इशारा दुर्वास चव्हाण यांनी दिला आहे.
दरम्यान घरांची नोंदणी बंद करण्यासंदर्भात कोणतेही आदेश दिले नसून सहाय्यक दुय्यम निबंधकांनी घरांचे रजिस्ट्रेशन करण्यास नकार दिल्यास त्याविरोधात जिल्हाधिकारी अथवा जिल्हा निबंधकांकडे दाद मागावी, असे सह जिल्हा निबंधक दि. प. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.