कल्याणमधील ४० झाडे झाली खिळे, बॅनरमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 12:27 AM2020-08-16T00:27:59+5:302020-08-16T00:28:06+5:30
‘अंघोळीची गोळी’ या संस्थेने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शनिवारी कल्याणमधील ४० झाडांवरील बॅनर, पोस्टर काढत अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला.
डोंबिवली : ‘अंघोळीची गोळी’ या संस्थेने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शनिवारी कल्याणमधील ४० झाडांवरील बॅनर, पोस्टर काढत अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. ‘अंघोळीची गोळी’ संस्था पाणीबचत आणि वृक्षसंवर्धनासाठी कार्यरत आहे. संस्थेतर्फे शाळा-महाविद्यालयांत याबाबत जागृती
के ली जाते. तसेच ‘खिळेमुक्त झाडे’ ही संकल्पना दोन वर्षांपासून मुंबई, ठाणे जिल्ह्यात राबवली जात आहे. वृक्षसंवर्धन हेच ग्लोबल वॉर्मिंगला उत्तर आहे, त्यामुळे खिळेमुक्त झाडे हा उपक्रम सर्वांनी आपल्या शहरांत राबवावा, असे आवाहन संस्थेचे कार्यकर्ते स्वप्नील शिरसाठ यांनी यावेळी केले.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शनिवारी कल्याणमध्ये राबवलेल्या उपक्रमात भूषण राजेशिर्के, चेतन म्हामुणकर, मंगेश तिवारी आदी युवकांनी सहभागी होत ४० झाडांवरील पोस्टर, बॅनर व खिळे काढले.
यावेळी संस्थेचे सचिव अविनाश पाटील म्हणाले की, पर्यावरण संरक्षण अधिनियम, महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम यासारखे कायदे व नियम झाडांसंदर्भात आहेत. मात्र, ते पाळले जात नाहीत. त्यामुळे हे नियम अधिक प्रभावी कसे होतील, यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. वृक्षसंवर्धनासाठी अनेक महानगरपालिकांकडे पत्रव्यवहार सुरू आहे. झाडांचे संरक्षण म्हणजेच वसुंधरा संरक्षणासाठी उचललेले एक छोटे पाऊल आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
ठाण्यात स्वातंत्र्य दिन निसर्गासोबत साजरा
लॉकडाऊनमध्ये निसर्गातील झाडांनी, प्राणीपक्ष्यांनीही मोकळा श्वास घेतला. याच निसर्गाचे रक्षण केले तरच आपण भविष्यात अधिक मोकळा श्वास घेऊ शकू, हे लक्षात घेत मातृसेवा फाउंडेशनने स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण न करता उलट वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने साजरा केला.
‘झाडे लावा, झाडे जगवा’ या मोहिमेंतर्गत ‘मातृसेवा’च्या कार्यकर्त्यांनी येऊर परिसरात शनिवारी वृक्षारोपण केले. अनेकदा वृक्षारोपण करण्यात येते. परंतु, त्या वृक्षांची पुढे निगा राखली जातेच, असे नाही.
याच पार्श्वभूमीवर ‘मातृसेवा’च्या अध्यक्षा संध्या सावंत म्हणाल्या की, नुसते वृक्षारोपण करून दुर्लक्ष करू नये. झाडांची निगा राखणेही महत्त्वाचे आहे. जागेची पाहणी करून, पाण्याची सोय बघूनच आम्ही वृक्षारोपण करतो. प्रत्येक रोपाची वेळोवेळी पाहणी करून त्याची पुरेशी काळजी घेतो, त्याला खतपाणी घालतो. ठामपाच्या शाळांत जाऊन झाडांची ओळख, परसबाग, फुलपाखरू उद्यान असे उपक्र म राबवतो.