मुरबाडमध्ये महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे ४० गावे १७ तास अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:47 AM2021-09-24T04:47:56+5:302021-09-24T04:47:56+5:30
मुरबाड : अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे मुरबाडच्या म्हसा परिसरातील ४० गावातील नागरिकांना सुमारे १७ तास अंधारात राहावे लागले. यामुळे आधीच ...
मुरबाड : अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे मुरबाडच्या म्हसा परिसरातील ४० गावातील नागरिकांना सुमारे १७ तास अंधारात राहावे लागले. यामुळे आधीच तोट्यात असलेल्या महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने या नुकसानीस जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
मुरबाड महावितरणच्या कार्यालयात कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयी वास्तव्य करीत नसल्याने, रात्रीच्या वेळी किरकोळ बिघाड झाल्यास अधिकारीच नसल्याने कर्मचाऱ्यांना आदेश देणार कोण? अशी परिस्थिती असते. बुधवारी सायंकाळी सहा वाजता म्हसा परिसरातील सासणे फिडरवर किरकोळ बिघाड झाला असता, दक्ष नागरिकांनी ही बाब स्थानिक कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र मुरबाड उपअभियंता तसेच शाखा अभियंता हे मुरबाडमध्ये वास्तव्य करीत नाहीत. तसेच ते फिरती कार्यक्रमानिमित्ताने कार्यालयात येऊन केव्हाही निघून जातात. त्यामुळे कर्मचारी वर्गदेखील गायब असतो, अशी नागरिकांची ओरड आहे. बुधवारी झालेल्या बिघाडानंतरही हेच झाले. त्यामुळे वीज खंडित झाल्याने या परिसरातील ४० गावे सुमारे १७ तास अंधारात होती. गुरुवारी दुपारी ११ नंतर साधारण वीजपुरवठा सुरळीत झाला.
-------------------
मुरबाड विभागात असणारी थकबाकी याची आकडेवारी ही कल्याण विभागीय कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावी लागेल. तसेच मुरबाड उपविभागात कर्मचारी वर्गाची कमतरता असल्याने नागरिकांना सेवा देणे अवघड होते.
- विवेक सिंगलवार, उपअभियंता, महावितरण मुरबाड