जागा वाटपापेक्षा ४०० पार महत्वाचे, उमेदवारांची घोषणा लवकरच होणार

By अजित मांडके | Published: March 19, 2024 05:32 PM2024-03-19T17:32:51+5:302024-03-19T17:33:02+5:30

मंगळवारी सकाळी ११ ते १ अशी दोन तास महत्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी झाली.

400 par more important than seat allotment, candidates will be announced soon | जागा वाटपापेक्षा ४०० पार महत्वाचे, उमेदवारांची घोषणा लवकरच होणार

जागा वाटपापेक्षा ४०० पार महत्वाचे, उमेदवारांची घोषणा लवकरच होणार

ठाणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये अद्यापही जागा वाटपावरुन एकमत होत नसल्याचे चित्र आहे. परंतु महायुतीत कोणताही दुरावा नसून त्यांच्यात एकवाक्यता असून यात प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल. त्यामुळे जागा वाटपापेक्षा ४०० पार कसे जाता येईल आणि महाराष्ट्रात ४५ पार कसे जाता येईल हे महत्वाचे असल्याने त्यानुसार काम करण्याचा निर्धार मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली. त्यातही खासदारांमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचा दावा यावेळी त्यांनी केला.

मंगळवारी सकाळी ११ ते १ अशी दोन तास महत्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी झाली. या बैठकीला राहुल शेवाळे, राजेंद्र गावित, भावना गवळी, श्रीरंग बारने, संजय मंडलीक आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत काही महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे. शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. त्यामुळे शिवसेनेला किती जागा मिळणार यावरुन चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यानुसार मंगळवारी झालेल्या बैठकीत शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांसमवेत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी शिंदे यांनी प्रत्येक खासदाराच्या मतदार संघाची माहिती जाणून घेतली.

तसेच आपल्याला महायुती म्हणूनच काम करायचे आहे, उमेदवार कोणताही असला तरी देखील महायुतीचा उमेदवार म्हणून त्याच्यासाठी काम करण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. तर येत्या एक ते दोन दिवसात भाजपच्या वरीष्ठ नेत्यांसोबत चर्चा करुन जागा वाटपाचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली. तर खासदारांची कुठेही नाराजी नसल्याचे सांगत त्यांचावर शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचेही सांगण्यात आले. परंतु प्रसार माध्यमातून जे वातावरण निर्माण होत आहे. ते होऊ नये यासाठी महायुतीमधील वरीष्ठ नेत्यांना सुचना द्यावा जो पर्यंत महायुतीचा फॉम्युर्ला घोषीत होत नाही तो पर्यंत कोणत्याही नेत्यांनी वक्तव्य करु नये जेणे करुन वातावरण दुषीत होणार नाही, याची काळजी घेतली जावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.

त्यातही जागा वाटपापेक्षा ४०० पार कसे जाता येईल यादृष्टीने विचार करण्यात येत असून राज्यातून ४५ पार कसे जाता येईल आदींवर चर्चा झाल्याचेही ते म्हणाले. महायुतीमध्ये कुठेही कुरघोडीचे राजकारण नसून त्यांच्यात एकवाक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. महायुतीत जागा वाटप करतांना प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल, कुठेही कटुता निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असेही या बैठकीत नमुद करण्यात आले. तर आमचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आल्याने ते जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल असेही ते म्हणाले.

राज ठाकरे यांच्या सोबत काम करायला आवडेल - नरेश म्हस्के

राज ठाकरे यांच्या बाबतीतील निर्णय लवकरच पुढे येईल. मात्र त्यांचे महायुतीत नक्कीच स्वागत केले जाईल. आम्हाला त्यांच्या सोबत काम करायला आवडेल असे मत शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले.  जागा वाटपाचा निर्णय हा वरीष्ठ नेते घेतील त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही करु. संजय राऊत यांची संस्कृती काय आहे, ते सर्व महाराष्टÑ पाहत आहे, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टिका करण्याची त्यांची लायकी नाही. महाविकास आघाडीची वज्र मुठ नाही, तर पैसे देऊन माणसे आणली होती अशी टिकाही म्हस्के यांनी केली.

Web Title: 400 par more important than seat allotment, candidates will be announced soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.