प्रमोशनच्या पैशांसाठी ४०० शिक्षक प्रतीक्षेत
By admin | Published: December 28, 2015 02:30 AM2015-12-28T02:30:40+5:302015-12-28T02:30:40+5:30
ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या सतत घटत असतांनाच गेली २४ वर्षे सेवा देऊनही ज्यांची पदोन्नती झालेली नाही, अशांना आश्वासित निवडश्रेणी
अजित मांडके, ठाणे
ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या सतत घटत असतांनाच गेली २४ वर्षे सेवा देऊनही ज्यांची पदोन्नती झालेली नाही, अशांना आश्वासित निवडश्रेणी (प्रमोशन शक्य नसल्यास त्याऐवजी पैसे) देणे नियमानुसार बंधनकारक असतांना अजूनही ४०० शिक्षक त्यापासून वंचित असल्याची बाब पुढे आली आहे. त्याच वेळी आधी या वेतनश्रेणीनुसार दिलेले आठ कोटी वसूल करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाने चालवल्याने नव्याने वाद उफाळून आला आहे.
खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ दिवसांत निवडश्रेणी देण्याचे आश्वासन शिक्षकांच्या मेळाव्यादरम्यान दिले होते. परंतु, त्यांच्या आश्वासनालाही महापालिकेच्या शिक्षण विभागाने केराची टोपली दाखविली आहे.
या शिक्षकांना अशा प्रकारे निवडश्रेणी देता येत नसल्याचा दावा महापालिकेच्या शिक्षण विभागाने केला असून त्यांना केवळ वरिष्ठ वेतनश्रेणी देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षण विभागात वाद आता रंगण्याची चिन्हे आहेत.
ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागात आजघडीला १२०० च्या आसपास शिक्षक आहेत. यातील सुमारे ४०० शिक्षकांना २४ वर्षे पूर्ण झाली असून या शिक्षकांनी आश्वासित वेतनश्रेणी मिळावी म्हणून शिक्षण विभागाकडे लढा सुरू केला आहे. या शिक्षकांना शासनाच्या नियमानुसार आश्वासित वेतनश्रेणी देता येत नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले असून त्यांना केवळ वरिष्ठ वेतनश्रेणी देता येऊ शकते, असा दावा केला आहे.
ज्या शिक्षकांची सेवा २४ वर्षे पूर्ण झाली असेल आणि त्यांना पदोन्नती देता येणे शक्य नसेल, त्यांना आश्वासित वेतनश्रेणी देता येऊ शकते, असा ठराव २००५ मध्ये झाला होता.
त्यानुसार, यापूर्वी काही शिक्षकांना वेतनश्रेणी देण्यात आली आहे. लेखापरीक्षण अहवालात यावर ठपका ठेवण्यात येऊन अशा नियमबाह्यपद्धतीने देण्यात आलेली वेतनश्रेणी पुन्हा वसूल करावी, असे म्हटले होते. त्यानुसार, शिक्षण विभागाने ही आठ कोटींची वसुली करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.